सावंतवाडी शहरात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या आजूबाजूला अवैध धंद्याचे जाळे आहे. तसेच सेवकांचे नातेवाईक अवैध धंद्यात आहेत, त्यामुळे असेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे प्रथम गृहराज्यमंत्री म्हणून डोळसपणे पहावे असे आवाहन जिल्हा काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केले.

या वेळी तालुका अध्यक्ष संजू परब, शहर अध्यक्ष सुधीर आडीवरेडकर, संतोष जोईल आदी उपस्थित होते. गृहराज्यमंत्री म्हणून खुनाच्या २५ वर्षांपूर्वीच्या फाईल दीपक केसरकर उघडणार आहेत, त्यांनी त्यापूर्वीच्या २५ वर्षे मागे जाऊन सोन्याच्या तस्करी करणाऱ्या फाईलदेखील खुल्या करून चौकशीचे धाडस दाखवावे असे आवाहन डॉ. परुळेकर यांनी दिले.

शिवसेना-भाजपत कपडेफाड सुरू होती. या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. शिवसेनेने लाचार होणार नाही असे म्हटले पण दोन राज्यमंत्रिपदांसाठी शिवसेना लाचार बनली. सन १९६० पासून आजतागायत असा प्रसंग घडला नाही, पण गृहराज्यमंत्रिपदासाठी लाचारी सेनेने पत्करली, असे डॉ. परुळेकर म्हणाले.

गृहराज्यमंत्रिपद मिळताच दीपक केसरकर बोलू लागले. कोकण दहशतमुक्त करणार म्हणाले. जुनी प्रकरणे बाहेर काढण्याची धमकी देऊ लागले. २५ वर्षांपूर्वी घडलेली प्रकरणे संपली असताना पुन्हा उकरत आहेत, असे डॉ. परुळेकर म्हणाले. राज्यात कायद्या सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पूर्वी रात्रौ चोऱ्या, घरफोडय़ा व्हायच्या पण आता दिवसाढवळ्या होत आहेत. वृद्ध लोक घाबरून आहेत, असे डॉ. परुळेकर म्हणाले.

अवैध धंद्यावर धाड घालणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांनी विद्यमान सेवकांच्या नातेवाईकांचे, कार्यकर्त्यांचे अवैध धंदे पाहावेत. शहरात त्यांच्या आजूबाजूला अवैध धंदे आहेत ते पाहावेत. शहरात भर गांधी चौकात व्हिडीओ पार्लरच्या नावाखाली गोव्यातील कॅसिनो सुरू आहे. व्हिडीओपार्लर मनोरंजनाचे साधन आहे, पण त्याचे कॅसिनो झाल्याचे डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी सांगून मटका, जुगार धंद्यावर टाच आणताना स्वत: आजूबाजूला पाहावे असे आवाहन केले.

सावंतवाडीत अनेक कुटुंबे अवैध धंद्यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. त्या सेवकांच्या नातेवाईकांची सारी माहिती कथन करतील, असे डॉ. परुळेकर म्हणाले. सावंतवाडीत धुमस्टाइल बाइक वरून चरस, गांजा व दारूचा व्यापार चालतो आहे, ही कोणाची मुले आहेत, हे धंदे कोण करत आहेत ते गृहराज्यमंत्री म्हणून उघड करावे, असे आवाहन डॉ. परुळेकर यांनी करून पर्यटन जिल्ह्य़ात आम. नितेश राणे यांनी वाहन तपासणीबाबत तक्रारी पूर्वीच केल्या आहेत, असे ते म्हणाले.

राज्यात महामार्गावर बॅरिकेड्स लावून तपासणी करण्यास मनाई आहे, पण सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बैकायदेशीरपणे बॅरिकेड्स लावून तपासणी सुरू आहे. जिल्ह्य़ात रस्त्याची चाळण झाली असताना कोटय़वधीची आकडेमोड करून काय उपयोग असे डॉ. परुळेकर म्हणाले. आरोंद्यात ५० लाख रुपये मिळाले. तात्काळ आम. वैभव नाईक तेथे पोहोचले. त्यांचा काय संबंध तेही कळायला हवे. आम. नाईक वेगाने पोहोचले त्याचे कारण सांगा, असे डॉ. परुळेकर म्हणाले.