महापालिकेची नोटीस

शाहू पॅटर्न नावाने राज्यभर गाजलेल्या राजर्षी शाहू महाविद्यालयाची लातूर-नांदेड रस्त्यावरील चारमजली इमारत, मुलांचे वसतिगृह हे सुमारे १४ हजार चौरस मीटरचे बांधकाम विनापरवाना करण्यात आले. नियमानुसार इमारत बांधकाम झाल्याचे शिक्षण विभागाला कळवून त्यांचीही फसवणूक केली. या इमारतीचे बांधकाम पाडण्यात यावे, अशी नोटीस महापालिकेने महाविद्यालयास दिली असल्याची माहिती माहिती अधिकाराचे कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सन २०१३-१४ च्या द्वितीय सत्रात राजर्षी शाहू कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची शाखा बसवेश्वर चौकातील नवीन इमारतीत स्थलांतरीत करण्यात आली. या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरी महापालिकेने ती बांधण्यास रीतसर परवानगी दिली नाही. इमारत बांधल्यानंतर महाविद्यालयाने या जागेचा एन. ए. केला. कोणतीही परवानगी नसताना शिक्षण उपसंचालकांना नियमानुसार बांधकाम केल्याचे सांगत व खोटी कागदपत्रे जोडून स्थलांतर प्रमाणपत्र हस्तगत केले. ४१०० चौरस मीटर बांधकाम जोत्यापर्यंत करण्यास परवानगी दिली असताना प्रत्यक्षात महाविद्यालयाने १४ हजार ८१८ चौरस मीटरचे बांधकाम पूर्ण केले.

भाईकट्टी यांनी १७ जुलस माहिती अधिकारात कागदपत्रे मिळवून या महाविद्यालयाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर सर्व चक्रे हलू लागली. शाहू महाविद्यालयाने २५ नोव्हेंबर २०१३ रोजी जोत्यापर्यंतच्या बांधकामाचा परवाना घेतला. त्यासाठी केवळ ५०० रुपये प्रारंभ प्रमाणपत्राची रक्कम भरली. बांधकाम परवान्यासाठी १७ लाख ७५ हजार ३६० रुपये शुल्क भरणे आवश्यक होते. संस्थेने ५० टक्के सवलत मिळावी, असा अर्ज दिला. त्यावर मनपाने कोणताही निर्णय घेतला नाही. इकडे संस्थेने चारमजली टोलेजंग इमारत विनापरवाना बांधूनही पूर्ण केली. त्यासंबंधी आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी भाईकट्टी यांनी मनपा आयुक्तांकडे केली.

महापालिकेने शाहू महाविद्यालयास २० ऑगस्टला नोटीस पाठवली. नोटीस पाठवून २ महिने झाले, तरी पालिकेने अजून कोणतीही कारवाई केली नाही. दुसरीकडे शिक्षण विभागाकडे संस्थेने खोटी कागदपत्रे पाठवून महाविद्यालय स्थलांतराचे प्रमाणपत्र मिळवले. त्यावर आक्षेप आल्यावर शिक्षण विभागाने महाविद्यालयास नोटीस पाठवली. त्यांनीही कोणतीच कारवाई केली नाही.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील हे माजी खासदार आहेत. त्यांच्या दबावामुळे महापालिका, शिक्षण विभाग सगळे नियम धाब्यावर बसवून महाविद्यालय इमारतीकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप भाईकट्टी यांनी केला आहे.

 

कायद्यापेक्षा हेतू लक्षात घ्या – जाधव

शाहू महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य व संस्थेचे सहसचिव अनिरुद्ध जाधव यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, आमच्या वरिष्ठ महाविद्यालयास स्वायत्त महाविद्यालयाची परवानगी मिळाली. कनिष्ठ महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत असायला हवी अशी त्यांची अट होती. त्यामुळे टप्प्याटप्प्याने पावणेतीन एकर जागा आम्ही विकत घेतली. पहिल्या दोन टप्प्यांतील जागा विकत घेण्याचे काम झाल्यानंतर घाईगडबडीने इमारत बांधकाम केले. महाविद्यालय सुरू करणे ही आमची गरज होती. आता नव्याने संपूर्ण जागेची कागदपत्रे एकत्र दाखवून त्याचा एन. ए. करून परवानगी मागण्याचे काम सुरू आहे. कायद्यापेक्षा आमचा शिक्षणाचा व्यापक हेतू लक्षात घ्यायला हवा. आमचा कोणाचाही वैयक्तिक स्वार्थ यात नाही.