News Flash

“ राज्यातील माध्यमांमधील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा!”

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवले मागणी पत्र

राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्याबाबत आज (बुधवार) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून मागणी केली आहे.

फडवीस आपल्या पत्रात म्हणतात, “देशातील सुमारे १२ राज्यांत प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील पत्रकारांना फ्रंटलाईन वकर्स म्हणून जाहीर करण्यात आले आहे. दुर्दैवाने, महाराष्ट्रात मात्र हा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे.”

तसेच, “राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार, पत्रकारांच्या विविध संघटना यासंदर्भात सातत्याने मागणी करीत आहेत. परवा तर राज्यातील पत्रकारांनी ऑनलाईन माध्यमांतून सांकेतिक आंदोलन देखील केले. करोना साथीच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो. या दुसऱ्या लाटेत देखील या रोगाला बळी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. अशात त्यांच्या सुरक्षेची. जिवितेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केल्यास आपसुकच लसीकरणात त्यांना प्राधान्य मिळेल..” असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

याचबरोबर “या करोना साथीच्या काळात रूग्णालयात जाऊन, स्मशानभूमीत जाऊन, जनसामान्यांच्या व्यथा मांडण्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधून हे पत्रकार बांधव या काळात काम करीत आहेत. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागरण करण्यात सुद्धा पत्रकारांचा आणि माध्यमांचा मोठा वाटा आहे. असे करत असताना करोना संक्रमित झालेल्या पत्रकारांची संख्या तर अतिशय मोठी आहे. असे असताना या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर सरकार पातळीवर मौन का? हे अनाकलनीय आहे.” असंही विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी बोलून दाखवलं आहे.

“करोनाच्या लॉकडाउनच्या कालात राज्य सरकारच्या अनेक विभागांना ज्याप्रमाणे वर्क फ्रॉम होम करता येत नाही, अगदी तशीच अवस्था राज्यातील पत्रकारांची देखील आहे. लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला घटनास्थळावर जाऊनच काम करावे लागते. त्यामुळे या संकटाचा सामना करीतच काम करावे लागते. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की, यासंदर्भातील निर्णय तत्काळ आणि विनाविलंब करावा. धन्यवाद..” असं पत्राच्या शेवटी फडणवीस यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 1:38 pm

Web Title: immediately declare all journalists and cameramen in the state media as frontline workers devendra fadnavis msr 87
Next Stories
1 “अग्रलेखांचा बादशाह माहिती होते, हे तर कोलांटउड्यांचे बादशाह निघाले”
2 “शरद पवारसाहेब तुम्ही दारुवाल्यांसाठी पत्र लिहिलं, शेतकऱ्यांसाठीही मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा ना”
3 “मराठा समाजाला एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करु नका”, आशिष शेलारांचं टीकास्त्र
Just Now!
X