मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे लाभ देण्याचा निर्णय मागे घेण्याचं आश्वासन ठाकरे सरकारने दिलं आहे.  भाजपाचे खासदार संभाजीराजे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. १० टक्केच्या EWS मध्ये सामील होण्यास सकल मराठा समाजाचा विरोध आहे. यातील जाचक अटी आम्हाला मान्य नाही असे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितले. ज्यानंतर हा  निर्णय मागे घेण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यातली बैठक संपली असून मिळालेल्या आश्वासनानंतर संभाजी राजे यांनी  मराठा समाजातील विविध पदाधिकारी समन्वयक यांची भेट घेतली.

मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर ठाकरे सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. मात्र मराठा समाजाच्या बांधवांनी घाबरुन जाऊ नये त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. इतकंच नाही तर मराठा आरक्षणाला जी स्थगिती दिली गेली ती मागे घेण्यात यावी यासाठी फेरविचार याचिकाही दाखल करण्यात आली आहे. दरम्यान आज मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे लाभ देण्याचा निर्णय मागे घेण्याचं आश्वासन महाराष्ट्र सरकारने दिले आहे.

खासदार संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आरक्षणाच्या मुद्यावर भेट झाली. या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित होते. तसंच मंत्री बाळासाहेब थोरात यांचीही उपस्थिती होती.

” EWS मध्ये अनेक जाचक अटी असल्याचं सांगत मराठा समाजाला त्या अंतर्गत आरक्षण देऊ नये अशी भूमिका मुख्यमंत्र्यांपुढे मांडली. EWS मध्ये आम्हाला तात्पुरतं आरक्षण नको, असं सांगत त्याचे तोटे आम्ही सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यानंतर मराठा समाजाला EWS मध्ये न टाकण्याचे आश्वासन दिलं” असं संभाजी राजे यांनी सांगितलं.