पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना सांगलीतील विश्रामबागमध्ये घडली होती. या प्रकरणी सांगलीतील न्यायालयाने आरोपी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे यांच्यासह सहाजणांना १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालयाबाहेर लोकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी १०० हून अधिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपी अनिकेत कोथळेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात घडली होती. या प्रकरणात अनिकेत पोलीस कोठडीतून पळाल्याचा बनाव पोलिसांनी रचला होता. मात्र सखोल चौकशीनंतर अनिकेतचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अनिकेतचा मृतदेह आंबा घाटात नेऊन जाळल्याची धक्कादायक बाबही उघड झाली आहे.

कोल्हापूर रस्त्यावर एका अभियंत्यास चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत (वय २६) आणि अमोल भंडारी (वय २३) या तरुणांना अटक केली होती. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या बाजूला डिटेक्शन ब्रँचचे ऑफिस असून सोमवारी रात्री दोन्ही आरोपींना चौकशीसाठी डिटेक्शन ब्रँचच्या कार्यालयात नेले जात होते. या दरम्यान दोन्ही आरोपींनी पळ काढल्याचे पोलिसांनी म्हटले होते. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामठे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद देत गुन्हादेखील नोंदवला होता. यातील अमोल हा मंगळवारी संध्याकाळी निपाणीत सापडला असला तरी अनिकेतचा थांगपत्ता लागत नव्हता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनिकेतचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केला होता. अनिकेतचे नातेवाईक आणि शहरातील नागरिक पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. बुधवारी अनिकेतचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आणि या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक युवराज कामठे आणि पोलीस कर्मचारी अनिल लाड, अरूण टोणे, सुरज मुल्ला, राहुल शिंगटे, झाकीर पट्टेवाला यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार उघड होताच सांगलीत तणाव निर्माण झाला. त्यामुळे विश्रामबाग पोलीस ठाण्याबाहेरील सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. या सर्व आरोपींचे निलंबन करण्यात आले या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.