सोलापुरात एकाच दिवशी करोनाबाधित आठ रुग्णांचा मृत्यू झाला तर नव्या १४ रूग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये एका बेकरी व्यावसायिकाचा समावेश आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ८३ झाली आहे. तर रूग्णसंख्या ८६५ वर पोहोचली आहे.
आज प्रथमच एकाच दिवशी आठ रूग्ण मृत्युमुखी पडल्यामुळे सोलापूरकरांना धक्का बसला असून सार्वत्रिक चिंता वाढली आहे. आज करोनाशी संबंधित २३० चाचणी अहवाल प्राप्त झाले असता त्यात १४ जणांना करोनाची लागण झाल्याचे दिसून आले. आठ मृतांमध्ये पाच पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे.

उत्तर कसबा भागातील एका ६१ वर्षाच्या बेकरी व्यावसायिकाला करोनाने बाधित केले होते. त्याच्यावर २४ मे पासून अश्विनी ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू होते. परंतु काल रात्री सव्वा नऊच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांसह इतरांचीही वैद्यकीय चाचणी घेण्यात आली आहे. त्याचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.

अक्कलकोट रस्त्यावरील गांधी नगरात राहणाऱ्या एका ४६ वर्षाच्या पुरूषासह वेणू गोपालनगरातील एका ४१ वर्षाच्या पुरूषाचाही करोनाने बळी घेतला आहे. दरम्यान, रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना अद्यापि ६७१ चाचणी अहवाल प्राप्त व्हायचे आहेत. त्यामुळे रूग्णसंख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्या रूग्णांची संख्या ३८० झाली आहे. आज दिवसभरात २९ रूग्ण करोनामुक्त होऊन रूग्णालयातून घरी परतले.