रोहिणी, मृग व आद्र्रा हे तिन्ही नक्षत्रं वाया गेल्यानंतर पुनवर्सू नक्षत्रात मात्र वरूणराजाने कृपा करीत सोलापूर जिल्ह्य़ात बहुतांश भागात हजेरी लावली. काल सोमवारी जिल्ह्य़ात  १५.२८ मिलिमीटर सरासरीने एकूण २७६.९० मि. मी. पाऊस झाला. या पावसाने शेतक-यांसह सर्वानाच दिलासा मिळाला असून खरिपाच्या हंगामात पिकांच्या रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मंगळवेढा व सांगोला या दुष्काळी भागावरही वरूणराजाने कृपा केली आहे.
गेल्या जून महिन्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्य़ात खरीप पिकांच्या पेरण्या होणार की नाहीत, याबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच दुष्काळाचे संकट कोसळण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. टंचाईमुळे जिल्ह्य़ात सध्या १७६ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असताना पाऊस पडण्यासाठी सारेजण आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. अखेर सुदैवाने वरूणराजाने कृपा करीत जिल्ह्य़ात सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात हजेरी लावली.
सोलापूर शहरासह उत्तर सोलापूर तालुक्यात ३६.२२ मिमी पाऊस पडला. तर दक्षिण सोलापूर तालुक्यात ३८.१५ मिमी पावसाची नोंद झाली. अक्कलकोट-२९.६१, मंगळवेढा-३८.४९, सांगोला-५६.६९, करमाळा-२७.१३, बार्शी-६.४१, पंढरपूर-१५.६१, माढा-१२.३३, मोहोळ-१२.७५ व माळशिरस-३.५१ याप्रमाणे पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.