पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा प्रस्ताव तीन वर्षांपासून लालफितीत

पुणे : राज्यातील पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांना शिष्यवृत्तीच्या नावाखाली तुटपुंजी रक्कम दिली जात आहे. शिष्यवृत्तीची रक्कम वाढवण्याचा माध्यमिक शिक्षण विभागाने तीन वर्षांपूर्वी पाठवलेला प्रस्ताव लालफितीच्या कारभारात अडकला असून, किरकोळ रकमेची शिष्यवृत्ती देऊन गुणवंत विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. राज्यातील जवळपास सात ते आठ लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. त्यापैकी पाचवी आणि आठवीच्या मिळून सुमारे ३३ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. पाचवीच्या विद्यार्थ्यांना सहावी, सातवी, आठवी अशी तीन वर्षांसाठी, तर आठवीच्या विद्यार्थ्यांना नववी आणि दहावी या दोन वर्षांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीय ग्रामीण, राष्ट्रीय सर्वसाधारण, ग्रामीण सर्वसाधारण, शहरी सर्वसाधारण, ग्रामीण अनुसूचित जाती, भूमिहीन शेतमजुराचा पाल्य, ग्रामीण आदिवासी असे विविध संच आहेत. तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांना पाचवीसाठी वर्षांतील दहा महिन्यांसाठी एकूण २५० ते १००० रुपये, तर आठवीसाठी ३०० रुपये ते १ हजार ५०० रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळते. त्यात पाचवीसाठी शिष्यवृत्तीचे मासिक दर २५, ५० आणि १०० रुपये, तर आठवीसाठी ३०, ४०, ७५ आणि १५० रुपये आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जाते. तर परीक्षा परिषदेकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शन संचांची किंमतही सुमारे जवळपास ३५० रुपये आहे.

‘काळानुरुप शिष्यवृत्तीची रक्कम वाढवण्याची गरज आहे. विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या रकमेकडे पाहून परीक्षा देत नसले, तरी त्यांच्या कष्टाचे कौतुक म्हणून काहीतरी चांगली रक्कम विद्यार्थ्यांना मिळायला हवी. त्यासाठी शासनाकडे शिष्यवृत्तीची रक्कम वाढवण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्या बाबतची कार्यवाही शासन स्तरावर प्रलंबित आहे,’ अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्हास्तरावर शिष्यवृत्ती जास्त

प्रत्येक जिल्ह्य़ातून राज्यस्तरावर दहा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी निवडले जातात. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून पाचवीसाठी ५० रुपये आणि आठवीसाठी ७५ रुपये मिळतात. तर जिल्हास्तरावर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांला १०० रुपये आणि १५० रुपये मिळतात. त्यामुळे राज्यस्तरावर गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीच्या बाबतीत उपेक्षाच होते.

२५ रुपये आणि ४० रुपये

आताच्या काळात एखादे पुस्तक घ्यायचे झाल्यास त्याची किंमतही ५० रुपयांपेक्षा कमी नाही. मात्र, आजही विदर्भातील ११ जिल्ह्य़ातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना दर महिना मिळणारी रक्कम अत्यल्प आहे. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून पाचवीसाठी २५ रुपये आणि आठवीसाठी ४० रुपये दिले जातात.

सध्याच्या काळाचा विचार करता शिष्यवृत्तीची रक्कम फारच थोडी आहे. त्यात वाढ करण्याची नितांत गरज आहे. केवळ शिष्यवृत्तीमध्ये वाढ न करता त्याच्या रचनेतही बदल करण्याची आवश्यकता आहे. शिष्यवृत्ती परीक्षा मानाची असली, तरी काही विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची रक्कमही महत्त्वाची असते. त्यामुळे शिष्यवृत्ती वाढवताना त्याची रक्कम चांगली असल्यास विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन वाटेल. तसेच बुद्धिमान विद्यार्थ्यांना त्यांच्यातील गुणवत्ता जोपासता येण्यासाठी शासन स्तरावरून विशेष कार्यक्रम राबवण्याची गरज आहे.

– डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ