उपचार व तपासणी केंद्र मर्यादित असल्याने डहाणूतील नागरिक त्रस्त

पालघर: डहाणू तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीच्या भागात करोनाचे रुग्ण मोठ्या वाढत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या तपासण्या करण्यासाठी मर्यादित केंद्र उपलब्ध असल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. गंभीर होणाऱ्या रुग्णांना सिटीस्कॅनसाठी बोईसर किंवा वापी येथे जावे लागत असून लांबवर जाऊनदेखील अनेकदा चाचणी होत नसल्याने गंभीर रुग्णांना इतरत्र स्थलांतरित करणे भाग पडत आहे.

डहाणू तालुक्यात सध्या उपजिल्हा (कुटीर) रुग्णालय डहाणू, उपजिल्हा रुग्णालय कासा, गंजाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच चिंचणी येथे आरटीपीसीआर चाचण्या केल्या जातात. करोनाचा प्रसार अधिक तर शहरी वर सागरी भागात झाला असून बाडापोखरण पासून ते झाई-बोर्ड गावांपर्यंत तसेच डहाणू शहरातील नागरिकांना कुटीर रुग्णालयात करोना तपासणी करण्यासाठी एकच केंद्र उपलब्ध आहे.

या रुग्णालयात दररोज शंभर ते दीडशे रुग्णांची आरटीपीसीआर तपासणी करण्याची क्षमता असून चाचणी करून घेण्यासाठी पहाटेपासून रांगा लागल्या असतात. आजारी रुग्णांना तपासणी केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनांची उपलब्धतेची समस्या असून अनेकदा तपासणी कोट्यामध्ये आपला नंबर न लागल्याने रुग्णांना तपासणी न करता परत जावे लागत असल्याचे सांगण्यात येते.

डहाणू येथे एचआरसीटी स्कॅन करण्याची खाजगी व्यवस्था सध्या नादुरुस्त अवस्थेमध्ये असल्याने येथील गंभीर रुग्णांना तपासणीसाठी बोईसर किंवा वापी मध्ये येथे असलेल्या खाजगी केंद्रामध्ये जावे लागते. त्या ठिकाणी देखील रुग्णांची गर्दी असल्याने तपासणी करून घेणे जिकरीचे व त्रासदायक ठरते.  डहाणू तालुक्यातील झाई, बोरीगाव, जांभुळगाव, अस्वाली, घोलवड, रामपूर इत्यादी सीमावर्ती गावांमध्ये वीस हजारांहून अधिक नागरिक राहत असून या नागरिकांना वैद्यकीय सुविधासाठी डहाणू शहरात किंवा गुजरात राज्यात जाण्याची मुश्किल ओढावत असून दोन्ही ठिकाणी येथील रुग्णांना तपासणीची संधी उपलब्ध होईल याची शाश्वती नसल्याने येथील नागरिकांची परवड होताना दिसून येते.

डहाणू तालुक्यातून मार्च महिन्यात २४५३ तर एप्रिल महिन्यात अजून पर्यंत ३२९२ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी मार्च महिन्यात १६५ तर एप्रिल महिन्यात अजूनपर्यंत ६२३ नागरिकांना आजाराचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

कुटीर रुग्णालयात असुविधा

डहाणू येथील कुटीर रुग्णालयात लसीकरण केंद्राच्या लगत करोना तपासणी केंद्र कार्यरत असून त्या बाजूला करोना उपचार केंद्र कार्यरत आहे. त्यामुळे या संपूर्ण रुग्णालय परिसरात करोना बाधितांचा वावर असतो. तपासणीसाठी किंवा लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना या आजाराची नव्याने लागण होण्याची भीती व्यक्त होत आहे. लसीकरण केंद्र तसेच आरटीपीसीआर तपासणी केंद्र मुख्य करोना रुग्णालया पासून दूरवर वेगळ्या बाजूला स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात यावी अशी मागणीदेखील पुढे येत आहे.