करोनाच्या संसर्गाचे लवकर निदान होण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अ‍ॅन्टीजेन चाचण्यांमुळे जिल्ह्यातील करोनाबाधित रूग्णांची संख्या वाढली असल्याचे चित्र पुढे आले आहे.

गेल्या  १४ ऑगस्टपासून जिल्ह्यात करोनाचे निदान करण्यासाठी आरटी—पीसीआर या सखोल चाचणीबरोबरच अ‍ॅन्टीजेन चाचण्या सुरू झाल्या असून काही खासगी रूग्णालयांमध्येही ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे अर्धा तासात निदान होऊ  लागले आहे. त्याचा बिनचूकपणा कमी असला तरी सकारात्मक रूग्ण आढळून आल्यास लगेच उपचार सुरू केले जात आहेत. या चाचणी पध्दतीमुळे जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. काही वेळा या चाचणीद्वारे निष्पन्न झालेल्या करोनाबाधितांचा आकडा ५० पेक्षा जास्त राहिला असून २१ ऑगस्ट रोजी तब्बल १३७ बाधित आढळून आले होते. अर्थात यापैकी बहुसंख्य अतिशय सौम्य लक्षणे असलेले किंवा बा लक्षणे नसलेले आहेत.

गेल्या शनिवारी आढळून आलेल्या ९४ करोनाबाधितांपैकीही ५० जण अ‍ॅन्टीजेन चाचणीद्वारे निष्पन्न झाले आहेत. याचबरोबर, जिल्ह्यात सलग दुसऱ्या रविवारी करोनामुळे मृत्यूची नोंद झालेली नाही; तसेच गेल्या दोन दिवसात रत्नागिरी तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या घटत चालली आहे.

शनिवारी रात्रीपर्यंत सापडलेल्या ९४ करोनाबाधितांपैकी २३ रत्नागिरी तालुक्यातील असून संगमेश्वर तालुक्यातील १७, दापोली तालुक्यातील १२ आणि चिपळूण व खेड तालुक्यातील प्रत्येकी ११ जण आहेत.

रत्नागिरी तालुक्यात नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये कारवांची वाडी परिसरातील ५ रुग्णांचा समावेश आहे. नाचणे परिसरात ३ रुग्ण सापडले असून गावखडी, चर्मालय, झारणी रोड, साखरपा, शेटे नगर, देवरुख, नेवरे, कुवारबाव, मिरजोळे आणि जयगड  एका कंपनीतील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. गेल्या आठ दिवसात याच खासगी कंपनीतील ठेकेदारी तत्त्वावर काम करणाऱ्यांचे अहवाल सकारात्मक येत असून त्यामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. बाधित रुग्णांबरोबरच बरे होणाऱ्यांचेही प्रमाण चांगले आहे. रविवारी दिवसभरात २३ रुग्ण बरे झाले आहेत.

मागील रविवारी, सोमवारी जिल्ह्यात एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नव्हता. त्यानंतर पुन्हा मृत पावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली. आठवडाभरानंतर पुन्हा रविवारी एकाही करोना बाधिताची नोंद झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा १३४ राहिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५६ करोनाबाधित

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी १५६ व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल बाधीत आले आहेत. जिल्ह्यात रविवारी  दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६४१  करोनाबाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ६०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रविवारी आणखी १५६ व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल बाधीत आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.