टाळेबंदीदरम्यान जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त भागात अंगणवाडय़ा, ग्राम बालविकास केंद्रे, आरोग्य व्यवस्था आदींवर प्रशासनाने भर न दिल्यामुळे पुन्हा एकदा कुपोषणाची समस्या भेडसावत आहे. जिल्ह्यात मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांत गेल्या वर्षीपेक्षा यंदा सुमारे १०० पेक्षा जास्त अतितीव्र  तर एक हजाराहून अधिक तीव्र कुपोषित बालके वाढल्याची बाब उघड झाली आहे.

गेल्या वर्षी मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांत १३७६ अतितीव्र कुपोषित बालकांची नोंद आहे तर १२६८४ तीव्र कुपोषित बालकांची नोंद झाली आहे. याउलट याच कालावधीत यंदा या आकडेवारीत वाढ झाल्याचे दिसून येते. या वर्षी १४९३ अतितीव्र तर १४०१३ तीव्र कुपोषित बालकांची नोंद झाली. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी अतितीव्र कुपोषित बालकांमध्ये तब्बल ११७ बालके तर तीव्र कुपोषित बालकांमध्ये १३२९ एवढय़ा संख्येने वाढ झाली आहे.

दरवर्षी पावसाळयादरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुपोषण वाढत असल्याचे आकडेवारीतून दिसते. गेल्या वर्षी मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांत सर्वाधिक कुपोषित बालकांची नोंद जव्हार तालुक्यातील असून येथे ४०१अतितीव्र बालकांची नोंद झाली होती. विक्रमगडमध्ये ३४५ व डहाणूत २१९ बालकांची नोंद होती.यंदा मार्च ते ऑगस्ट याच काळात जव्हार, डहाणूत कुपोषण मोठय़ा संख्येने वाढले आहे. जव्हार तालुक्यात ५२४ बालकांची तर डहाणूत ३१७ बालकांची नोंद झाली. विक्रमगडमध्ये २४४ बालके अतितीव्र असल्याची नोंद झाली. तलासरी व पालघर तालुक्यात कुपोषण अल्प आहे.

गेल्या वर्षी पेक्षा यंदा जव्हारमध्ये १२३ कुपोषित बालके वाढली असून डहाणूत १०२ बालके वाढल्याची नोंद झाली. वाढत असलेली ही कुपोषित बालके चिंतेचा विषय आहे. विक्रमगड तालुक्यात गेल्या वर्षीच्या संख्येपेक्षा १०१ बालके कमी झाल्याची नोंद आहे. सकस, पोषक आहाराच्या कमतरतेमुळे हे कुपोषण वाढले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. करोनाच्या टाळेबंदीत अंगणवाडय़ा बंद होत्या. तसेच ग्राम बालविकास केंद्रे बंद होती. शासनाचा निधी पुरेसा नव्हता याचा  विपरीत परिणाम बालकांच्या आरोग्यावर झाल्याने ते कुपोषणाच्या खाईत लोटले गेले. परिणामी कुपोषित बालकांची संख्या आणखीन वाढत गेली.

करोनाकाळात जिल्हा प्रशासन कुपोषण निर्मूलनासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत असे तत्कालीन जिल्हाधिकारी कैलास शिंदे वारंवार त्या वेळी सांगत होते. प्रशासनाच्या प्रयत्नाने कुपोषण निर्मूलन होत आहे असे प्रशासन भासवत असले तरी याच काळात कुपोषित बालकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली ही खरी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या काळात कुपोषण रोखण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे हेच या वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

मार्च ते ऑगस्ट (६ महिने)

अतितीव्र कुपोषित बालके

तालुके  २०१९   २०२०

डहाणू   ३१९ ३१७

तलासरी १७ ८

मोखाडा १३० १६३

जव्हार  ४०१ ५२४

विक्रमगड   ३४५ २४४

वाडा १७८ १५२

पालघर  २९ १०

वसई   ५७ ७५

एकूण   १३७६   १४९३

मार्च ते ऑगस्ट (६ महिने) तीव्र कुपोषित बालके

तालुके  २०१९   २०२०

डहाणू   ११४०   २३३६

तलासरी १०४७   १०९६

मोखाडा ८७९ ९२८

जव्हार  ४१३२   ४१७६

विक्रमगड   २५६५   २७१९

वाडा २०८६   १८३४

पालघर  ३४४ १५८

वसई   ४९१      ७६६

एकूण   १२६८४  १४०१३

कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणांच्या समन्वयाने विशेष प्रयत्न सुरू आहेत. निर्मूलनच नव्हे तर त्याचे उच्चाटन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

– सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. पालघर

गावाबाहेर गेलेली कुटुंबे, रोजगारासाठी स्थलांतर झालेल्या कुटुंबातील बालकांची नोंदच शासकीय आकडेवारीत समाविष्ट नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणा कुपोषित बालकांच्या आकडेवारीतील मेळ बसत नसल्याचे सांगितले जात आहे.