हर्षद कशाळकर

इंडोनेशिया येथील बाली येथे अकराव्या आशियायी शिकारी पक्षी संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ते १६ ऑक्टोबर दरम्यान होणारया या परिषदेत महाडचे पक्षी अभ्यासक प्रेमसागर मिस्त्री भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. गिधाडांवरील संशोधन प्रबंध ते परिषदेत मांडणार आहेत.

जगातील साठ देशातील पक्षीसंवर्धनासाठी काम करणारे पक्षी तज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत. गिधाड, ससाणे, गरुड, घुबड आणि घार यासारख्या शिकारी पक्षांबाबत या परिषदेत संशोधन प्रबंध सादर केले जाणार आहे. निसर्ग संवर्धन चळवळीला चालना देणे, दुर्मिळ होत चाललेल्या शिकारी पक्षांच्या संवर्धनाला चालना देणे हा या परिषदेमागचा उद्देश आहे.

यात सिस्केप या संस्थेच्या माध्यमातून गिधाडांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या प्रेमसागर मिस्त्री यांचा समावेश करण्यात आला आहे. गेली दोन दशक ते रायगड जिल्ह्यात चिरगाव येथे गिधाड संवर्धनासाठी कार्यरत आहे. गिधाडांचा अधिवास संरक्षीत करणे, त्यांना मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध करून देणे आणि दुर्मिळ होत चालेलेल्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे, गावागावात जाऊन गिधाडांबाबत जनजागृती करणे यासारख्या पातळ्यांवर ते आणि त्यांची सिस्केप हि संस्था कार्यरत आहेत. जागतिक पातळीवर त्यांच्या या कार्याची दखल घेण्यात आली आहे. परदेशी अभ्यासकांनी त्यांच्या गिधाड संवर्धन प्रकल्पाला भेट देऊन माहिती संकलीत केली आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन त्यांना गिधाड संशोधन प्रबंध सादर करण्यासाठी परिषदेत बोलविण्यात आले आहे.

कोकण किनारपट्टीवर आढळून येणारया समुद्री गरूड या पक्षावर प्रेमसागर मिस्त्री यांनी शोधप्रबंध लिहिला आहे. तो रशियन रॅप्टर रिसर्च कन्झव्‍‌र्हेशन नेटवर्क यांच्याकडून आयोजीत सायंन्टीफीक अँण्ड प्रॅक्टीकल परिषदेत यापुर्वी सादर झाला आहे. तर आरआरसीएन या रशीयन नियतकालिकात त्यांचा शिकारी पक्षांवरील लेख प्रसिध्द झाला आहे. यापुर्वीही त्यांनी आंतराष्ट्रीय पक्षी संवर्धन परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.