सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणा करोना साथीला रोखण्यासाठी एकवटली असताना याच कालावधीत जिल्ह्यात माकडतापाने डोके वर काढले आहे. माकडतापाचे रुग्णही सापडत असल्याने आरोग्य यंत्रणा दक्षता घेत आहे.

गेल्या तीन महिन्यांत तीन रुग्णांचा माकडतापाने मृत्यू झाला असून २८ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी  दिली. मणिपाल येथील प्रयोगशाळा बंद झाल्याने शासनाने माकडताप संशयित रुग्णांच्या रक्त तपासणीसाठीचे नमुने मिरज येथे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आठवडय़ातून दोन वेळा रुग्णांचे नमुने मिरजच्या प्रयोगशाळेत पाठवले  जातात. गेल्या तीन महिन्यांत माकडतापाने तीन रुग्णांचा मृत्यू झाला, ही बाब गंभीर असून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने संबंधित रुग्णांचे वेळेवर तपासणी करून तत्काळ नमुने पाठवावेत, अशी सूचना जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी केली आहे.