प्रचंड महागाईच्या धर्तीवर गणेशमूर्तीच्या किमती प्रत्येकी पाचशे रुपयांनी महागल्या असल्या तरी गणेशभक्तांचा उत्साह लय भारी आहे. महागाईच्या सावटाने गणेशभक्ती कमी झाली नसून भक्तीत वाढच झाल्याचे दिसत आहे.
कोकणात श्रीगणेश चतुर्थी सण घरोघरी साजरा केला जातो. या गणेश भक्तीमुळे मुंबई, पुणे, गोवा अशा विविध शहरात नोकरीनिमित्त असणारे चाकरमानी गावी येतात. श्रीगणेश चतुर्थी सणापूर्वी अगोदर तीन महिने चाकरमानी मंडळींची लगबग सुरू असते. तसेच भक्तांची घरची रंगरंगोटी, गणेशमूर्तीची निवड आणि गणेश आराससाठी धावपळ सुरूच असते. श्रीगणेश भक्तीमुळे गरिबांपासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकजण आपल्या आर्थिक शक्तीप्रमाणे गणेश पूजन करून सण साजरा करतो. तसेच लहान गणेश भक्त मूर्तीची निवड करताना यंदा ‘जय मल्हार’ गणेशमूर्तीच्या रूपात अनेक भक्तांनी निवड केल्याचे श्रीगणेश चित्रशाळांमधून सांगण्यात आले.
गणेश चतुर्थी १५ दिवसावर येऊन ठेपली आहे, त्यामुळे हा सण लय भारी व्हावा म्हणून प्रत्येक गणेशभक्त प्रयत्न करत आहेत. त्यासाठी भक्तांची धावपळ उडाली आहे.
प्रचंड महागाईमुळे श्रीगणेश मूर्ती किमान ५०० रुपयांनी महागली आहे. मूर्ती बनविण्यासाठी माती, रंग, कारागीर यांच्या खर्चात वाढ झाली असून, मूर्तीला आकार देण्यापासून कलाकुसरीने रंग देण्यापर्यंत मूर्ती कलाकार अहोरात्र मेहनत घेत आहेत.
सावंतवाडी भटवाडी येथील मूर्तिकार उदय अळवणी यांच्या श्रीगणेश चित्रशाळेत भेट दिली असता ते गणेश मूर्ती रंगविण्यात मग्न असल्याचे दिसले. त्यांच्या चित्रशाळेत सुमारे २५० ते ३०० मूर्ती ते बनवितात.
अळवणी यांना विचारले असता ते म्हणाले, लहान-मोठय़ा मूर्तीची किंमत भक्तांना परवडेल अशीच ठेवण्यात आली आहे. प्रत्येक मूर्ती ५०० रुपयांनी गतर्षीपेक्षा महागलेली आहे. महागाईचे सावट माती, रंग व कलाकारांना असल्याने मूर्तीच्या किंमती वाढविण्याशिवाय पर्याय नाही असे ते म्हणाले.