पालघर तालुक्यातील सफाळे, केळवा-माहीम, शिरगांव व इतर ठिकाणी नारळ लागवडीवर पसरलेला स्पायरेलिंग व्हाईट फ्लाय (Rugose Spirallying white fly) अर्थात पांढऱ्या माशीचा  प्रादुर्भाव सध्या केळी, पपई, जास्वंद व इतर झाडां-झुडुपांवर पसरल्याचे दिसून आला आहे. यामुळे येथील शेतकरी- बागायतदार वर्ग चिंतातुर झाला आहे. या सफेद माशी मुळे नारळाव्यतिरिक्त शेती- बागायतीचे नुकसान तोटा नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.

ऑक्टोबर 2019 महिन्यात या सफेद माशीची लागण नारळाच्या झाडावर झाल्याचे दिसून आले होते. ही माशी नारळाचा पानाच्या खालच्या बाजूला गोल रिंगणामध्ये अंडी घालत असून पानाच्या पृष्ठभागावर बुरशी वाढत असल्याने पानाची प्रकाश संश्लेषणावर परिणाम होतो. या माशी कडून पानांमधून पौष्टिक द्रव्य शोषण केले जात असून नारळाच्या वाढीवर परिणाम होत असल्याचे दिसून येते. पालघर तालुक्यातील अनेक भागात या माशीचा प्रादुर्भाव झाला असून बुटक्या जातीचा केशरी व हिरव्या जातीच्या नारळा व परिणाम झाला असून या रोगाचा प्रसार वाढत राहिला तर उत्पादकतेवर परिणाम होईल अशी शक्यता आहे.

नारळा प्रमाणे या माशीचा प्रसार केळीच्या लागवडीवर तसेच पपईच्या झाडांवर तसेच जास्वंद वर झाला असून यामुळे या झाडांची पाने काळसर पडली आहे. या माशीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने अनेक बागा काळ्या पडल्याचे दिसून येत आहे. या माशीचा परिणाम फळ पिकांच्या उत्पादनावर होईल अशी भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पालघर तालुक्याचे कृषी अधिकारी तरुण वैती यांनी तालुक्‍यातील किनारपट्टीवरील अनेक गावांचा पाहणी दौरा करून या माशीच्या प्रादुर्भावाचा अभ्यास केला. ह्या मावशी मुळे अनेक झाडांच्या पृष्ठभागावर प्रसार झाला असला तरी देखील या माशीमुळे नारळाव्यतिरिक्त इतर झाडांवरील द्रव्य किंवा सत्वाचे शोषण केले जात नसल्याचे पाहण्यात आले आहे. यासंदर्भात कृषी विभागाने कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची संपर्क साधला असून या सफेद माशी मुळे इतर झाडांच्या वाढीवर तसेच फळ उत्पादनावर परिणाम होणार नसल्याचे खात्रीपूर्वक सांगितले आहे. तरीदेखील या सफेद माशीच्या प्रसारावर व झालेल्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना आखावी अशी मागणी येथील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.