लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : अकोलेकरांचा अपमान करण्याचा प्रकार कोणीही करू नये. प्रशासनात समन्वय नसल्याने करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पालकमंत्री बच्चू कडूंनी अकोलेकरांना दोष देण्याऐवजी प्रशासनावर आपली पकड मजबूत करावी. सरकार आदेश ऐकत नसेल तर हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे, अशी खरमरीत टीका भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली. ‘करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अकोलेकरच निरुत्साही’ बच्चू कडूंच्या या अजब विधानावरून आ.शर्मांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.

अकोलेकर अत्यंत संयम बाळगणारे आहेत. शहरातील नागरिकांनी प्रत्येक कार्यात व अनेक वेळा ओढवल्या संकटात सदैव सहकार्याची भूमिका घेतली. करोना आपत्तीच्या काळातही नागरिक प्रशासला आवश्यक ते सर्व सहकार्य करीतच आहेत. दुसरीकडे पोलीस, आरोग्य, महसूल विभाग व मनपा प्रशासन आपसात समन्वयाने काम करतांना दिसत नाहीत. दररोज निर्णय बदलणे प्रशासनाचा नियम झाला आहे. रुग्णालय, विलगीकरण कक्षात योग्य ती व्यवस्था नाही. नियोजनाचा अभाव आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. निधी नेमका कुठे खर्च होत आहे, याची कल्पना नाही. यंत्रणा असताना त्यांच्याकडून काम करून घेण्यात अपयशी ठरले आहेत, असा आरोप आ.शर्मा यांनी केला.

स्वयंस्फूर्त जनता संचारबंदीला नागरिकांची साथ का मिळाली नाही, याचे आत्मचिंतन करा, असा सल्लाही त्यांनी दिला. उपाययोजना करून अधिकाऱ्यांमार्फत त्याची योग्य अंमलबजावणी करावी. राज्य शासनाकडून विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करणे गरजेचे आहे. तसेच सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये जागा भरून ते त्वरित सुरू करण्यात यावे, अधिकारी अकोलेकरांना योग्य सेवा देत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आ.शर्मा यांनी केली. जनतेवरच थेट आरोप करण्याऐवजी त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.

अपयशी ठरल्याने जनतेवर आरोप
टाळेबंदी काळातील जनतेच्या गरजा, रोजगार, कौटुंबिक जबाबदारी यावर प्रशासन गंभीर नाही. काहीही उपाययोजना नाहीत. विदर्भातील सर्वाधिक रुग्ण व मृत्यू संख्या जिल्ह्यात आहे. त्यावर नियंत्रण करण्याऐवजी पालकमंत्री थेट जनतेला दोष देत आहेत. हा प्रकार अनाकलनीय असून प्रशासन हे सर्व पातळीवर अपयशी ठरले, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केला.