भाजपचे युवा नेते अद्वय हिरे आणि येथील महानगरप्रमुख सुनील गायकवाड यांच्यात पक्षांतर्गत स्पर्धेतून निर्माण झालेल्या कलहाने आता गंभीर वळण घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ताज्या घटनेत मध्यरात्रीच्या अंधारात उभयपक्षी झडलेल्या वादात शिवराळ भाषेचा झालेला वापर, वाहनावरील दगडफेक, मारहाणीचे पोलिसात गेलेले प्रकरण मागे घेण्याची उभयपक्षी आलेली नामुष्की तसेच त्यानंतर परस्परांवर सुरू झालेल्या टीकेच्या फैरी यामुळे भाजपची चांगलीच शोभा झाली आहे. पक्ष विस्ताराच्या हव्यासापोटी निष्ठावंतांना डावलून अन्य पक्षीय लोकांना पक्षात घेण्यासाठी पायघडय़ा टाकण्याच्या कृतीला वाईट फळे येऊ शकतात, असा धडा घेण्याची वेळही या निमित्ताने भाजपवर आली आहे.

निश्चलनीकरणामुळे भरडले गेलेले सर्वसामान्य लोक अजूनही सावरत नसले तरी केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशाचे कसे भले हे सांगणे तसेच ते लोकांच्या गळी उतरवून देण्याचा भाग म्हणून अलीकडेच भाजपतर्फे ठिकठिकाणी ‘कालाधन विरोधी दिन’ साजरा करण्यात आला. असाच कार्यक्रम भाजपने येथेही आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्ष कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याबाबत अद्वय हिरे यांनी समाज माध्यमांद्वारे केलेल्या आवाहनाचा मजकूर गायकवाड समर्थकांना खटकला. त्यांनी त्यास आक्षेप घेतल्यावरून वादाची ठिणगी पडली आणि या कार्यक्रमाच्या आदल्या रात्रीच त्याचे पर्यवसान वाद विकोपाला जाण्यात झाले. यात प्रारंभी भ्रमणध्वनीद्वारे परस्परांची उणीदुणी काढण्याचा तसेच परस्परांना आव्हान-प्रतिआव्हान देण्याचा प्रयत्न झाला. त्यातून हिरे हे मध्यरात्रीच गायकवाड यांचे निवासस्थान असलेल्या सटाणा नाका भागात जाऊन धडकले. तेथे त्यांच्या वाहनावर दगडफेक झाली. या वेळी गायकवाड समर्थकांशी त्यांचा वाद होऊन शिवीगाळ, मारहाणीचा प्रकार घडला. यात हिरे हे किरकोळ जखमी झाले. नंतर हिरे व गायकवाड समर्थकांनी परस्परांविरोधात पोलिसात तक्रारी दिल्या. मात्र नंतर दोन्ही गटांनी तडजोड करून तक्रारी मागे घेत सामंजस्याची भूमिका घेतली.

हिरे आणि गायकवाड यांचे पक्षांतर्गत दोन गट आधीपासूनच अस्तित्वात आहेत. गेल्या मे महिन्यात झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी उमेदवारी देताना आपापल्या समर्थकांची वर्णी लावण्यावरून दोन्ही गटांमध्ये चांगलीच जुंपली होती. नंतर प्रचार ऐन रंगात आला असतांना हिरे-गायकवाड यांच्यातील मतभेद वाढत गेले होते. उभयतांमधील वादाचा त्या निवडणुकीत पक्षाला फटका बसल्याची ‘सल’ भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आजही बोलून दाखवत आहेत. दरम्यानच्या काळात उभयतांनी आपसातील मतभेद मिटवत पक्षांतर्गत वाद मिटल्याचे चित्र निर्माण केले होते. मात्र ताज्या प्रकारामुळे उभयतांमधील धुसफूस सुरूच असून नजीकच्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता दिसून येत आहे. या भांडणानंतर हिरे-गायकवाड यांनी परस्परांवर जाहीर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. पक्ष सत्तेचा वापर करत गायकवाड हे अवैध धंद्यांना आश्रय मिळवतात असा थेट आरोप हिरे यांनी केला तर हिरे यांचे मानसिक संतुलन बिघडलेले असून मनमानी करत ऊठसूट पक्षविरोधी भूमिका घेण्यात त्यांना काहीच वावगे वाटत नसल्याची टीका गायकवाड यांनी केली.

हिरे-गायकवाड यांच्यातील या वादामागे वर्चस्व तसेच पक्षांतर्गत स्पर्धा हे मूळ कारण असल्याचे सांगण्यात येते. शहरात प्रभाव असलेल्या सुनील गायकवाड यांनी महापलिकेचे राजकारण करावे आणि हिरेंनी विधानसभा निवडणूक लढवावी असा ‘आपसी करार’ झालेला असतांना पालिकेच्या राजकारणात लुडबुड करून हिरे त्रास देतात असा गायकवाड यांचा त्रागा आहे. शिवाय गेल्या वेळी गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात अपयश आले तरी आता उमेदवारी मिळाल्यास भाजपच्या वारूवर आपण तरून जाऊ, अशी त्यांची महत्त्वाकांक्षा असू शकते. अलीकडे ग्रामीण भागात त्यांनी वाढविलेल्या जनसंपर्कामुळे या शक्यतेला आणखीच पुष्टी मिळते. दुसरीकडे गेल्या विधानसभा निवडणुकीत नांदगाव मतदार संघातून उमेदवारी करणाऱ्या अद्वय हिरे यांनी येत्या निवडणुकीत मालेगाव बाह्य़ मतदार संघातून उमेदवारी करण्याची घोषणा करून त्यादृष्टीने कामही सुरू केले आहे. त्यामुळे एकंदरीत एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही, अशातला हा प्रकार आहे.

पक्षांतर्गत स्पर्धेतून गायकवाड यांची महानगरप्रमुख पदावरून उचलबांगडी करून तेथे आपल्या गटातील व्यक्तीची वर्णी लावावी म्हणून गेल्या काही दिवसांपासून हिरे गट सक्रिय झाला आहे. त्यासाठी गेल्या दोन नोव्हेंबर रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची मुंबईत एका शिष्टमंडळाने भेटही घेतली होती. त्यावर पक्षश्रेष्ठींनी अद्याप काही निर्णय घेतला नसला तरी हिरे गटाचा हा पावित्रा हेही गायकवाड समर्थकांना जिव्हारी लागणारा असू शकतो. त्याचमुळे मतभेदांची दरी दिवसेंदिवस रुंदावत असल्याचे सांगण्यात येते. शहर व ग्रामीण भागात भाजपमध्ये निष्ठावान, हिरे आणि गायकवाड असे तीन गट कार्यरत आहेत.

हिरे यांचे घराणे काँग्रेस-सेना-राष्ट्रवादीमार्गे भाजपमध्ये दाखल झाले तर सुनील गायकवाड हेही भाजप-काँग्रेस-मनसे-राष्ट्रवादीमार्गे पुन्हा स्वगृही परतले आहेत. या दोघांमधील भांडणामुळे पक्षातील अनेक निष्ठावान आता कोडय़ात पडले आहेत. शिवाय पक्षविस्तार, सत्तेच्या हव्यासापोटी बाहेरील लोकांना पक्षात पावन करून घेताना निष्ठावंतावर अन्याय झाला तरी चालेल ही भाजपची आजवर रणनीती राहिलेली आहे. त्याचा राजकीय लाभ पक्षाला झाला असेल हे मान्य केले तरी हिरे-गायकवाड यांच्यातील भांडण, त्याद्वारे पक्षाची झालेली शोभा यामुळे भाजपच्या कुणालाही पावन करून घेणाऱ्या रणनीतीला वाईट फळेही येतात, हेही या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.

गटबाजी शिगेला

भाजपचे युवा नेते अद्वय हिरे आणि येथील महानगरप्रमुख सुनील गायकवाड यांच्यात पक्षांतर्गत स्पर्धेतून निर्माण झालेल्या कलहाने आता गंभीर वळण घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. मारहाणीचे पोलिसात गेलेले प्रकरण मागे घेण्याची उभयपक्षी आलेली नामुष्की तसेच त्यानंतर सुरू झालेल्या टीकेच्या फैरी यामुळे भाजपची नाचक्की झाली आहे.