बडवे व उत्पात मंडळी पायउतार झाल्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दैनंदिन पूजाअर्चा व अन्य धार्मिक विधी करण्यासाठी मंदिर समितीच्यावतीने पुजारीपदासाठी मुलाखतीसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. १९९ इच्छूक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी प्रत्यक्षात १२९ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यात २१ महिलांचाही सहभाग होता. येत्या ९ जून रोजी होणाऱ्या मंदिर समितीच्या बैठकीत पुजारीपदावर पात्र उमेदवारांच्या नियुक्तया करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे मंदिर समितीच्या सूत्रांनी सांगितले.
गेल्या १५ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार विठ्ठल मंदिरात वंश परंपरागत धार्मिक नित्योपचार करीत आलेल्या बडवे व उत्पातांसह अन्य सेवाधाऱ्यांना पायउतार व्हावे लागले. त्यामुळे मंदिरात कायमस्वरूपी पुजारी नियुक्त करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला. सद्य:स्थितीत मंदिर समितीचेच काही कर्मचारी विठ्ठल-रुक्मिणीमातेची दैनंदिन पूजाअर्चा व इतर नैमित्तिक धार्मिक विधी पार पाडण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. पुजारीपदाच्या ८ जागांसाठी इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असता त्यात ब्राह्मण समाजाबरोबरच ब्राह्मणेतर म्हणजे हिंदू धर्मातील थेट मागासवर्गीय, ओबीसी व महिलांनासुध्दा पुजारीपदासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र त्यानुसार प्राप्त झालेल्या अर्जामध्ये व प्रत्यक्ष मुलाखत दिलेल्या ब्राह्मणेतर तथा मागासवर्गीय उमेदवारांची संख्या व त्याचा तपशील मंदिर समितीकडून मिळाला नाही.
धार्मिक व सामाजिकदृष्टय़ा या क्रांतिकारी निर्णयाचे स्वागत होत असताना पुजारीपदासाठी पंढरपूर व सोलापूरसह महाराष्ट्रातील विविध भागातून अर्ज केलेल्या उमदेवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. हिंदूधर्म शास्त्री पंचांगकर्ते मोहन दाते, माणिक जंगम, बल्लाळ, मंदिर समितीचे सदस्य वसंत पाटील तसेच स्थानिक प्रतिनिधी म्हणून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष काशिनाथ थिटे यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. काकड आरतीपासून ते शेजारतीपर्यंत सर्व नित्योपचार, तसेच वर्षांत होणारे नैमित्तिक धार्मिक उपचार शास्त्रोक्त पध्दतीने पार पाडता येतात का, तसेच श्रींची षोडशोपचारे पूजा, पोशाख आदीबाबतचे ज्ञान विचारण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 19th May 2014 रोजी प्रकाशित
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पुजारीपदासाठी मुलाखती पूर्ण
बडवे व उत्पात मंडळी पायउतार झाल्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दैनंदिन पूजाअर्चा व अन्य धार्मिक विधी करण्यासाठी मंदिर समितीच्यावतीने पुजारीपदासाठी मुलाखतीसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
First published on: 19-05-2014 at 03:19 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview complete in worshipers in vitthal temple of pandharpur