|| निखिल मेस्त्री

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा आविष्कार

 

पालघर : अभ्यासक्रमाव्यतिरिक्त चौकटीबाहेरच्या संकल्पनेतून पारंपरिक ऊर्जेचा पुरेपूर वापर करून इंधनऐवजी सौर ऊर्जेवर वाहन तयार केल्यानंतर पालघरमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आता सोलार बोटीचा आविष्कार करून त्याची यशस्वी प्रात्यक्षिके घेतली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या आगळ्यावेगळ्या संकल्पना भविष्यात उपयोगी ठरणार आहेत.

पालघर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षणार्थींना विद्यार्थ्यांनी सौर बोट बनवली असून प्रदूषण करणाऱ्या इंधनाला हा एक अत्यंत चांगला पर्याय ठरणार आहे. मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारी सौर ऊर्जा हा उत्कृष्ट पर्याय ठरत आहे हे या प्रयोगाचे वैशिष्ट्य आहे.

संस्था पालघर येथे वेगवेगळ्या व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेत बहुतांश विद्यार्थी ग्रामीण क्षेत्रातील आहेत. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या संकल्पनेला संस्थेतील तंत्रशिक्षक वाट काढून देत त्यांच्या उपक्रमांना बळ देत आहेत. नव्याने बनवण्यात आलेल्या सौर बोटीला ९० हजार रुपये खर्च आला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. ही सोलार बोट त्यासाठी उत्तम पर्याय ठरेल असा विश्वास औद्योगिक संस्थेचा आहे. तसेच पर्यटनपूरक समुद्र व्यवसायासाठीही ही संकल्पना उत्तम ठरू शकते. सौर बोट बनवण्यासाठी लागलेला निधी हा आजी-माजी प्रशिक्षणकत्र्यांनी, संस्थेचे प्राचार्य एस. एन. परदेशी, निदेशक जे. आर. पाटील, डी. आर. भारमल, के. बी. आहेर, केतन किणी यांनी उभा केला. सौर बोट बनवण्यासाठी संस्थेचे निर्देशक प्रमोद पाटील, निजाई, नीलेश धोंडी, डी. व्ही. गवस, रोशन संखे, केतन किणी यांनी सहकार्य केले आहे.

 

 

अपारंपरिक सौर ऊर्जा स्रोत लक्षात घेता इंधनाला पर्याय शोधणे हा या संकल्पनेचा प्रमुख उद्देश आहे. यामुळे प्रदूषणमुक्त राहता येईल. ही संकल्पना वाहन व मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा नेहमीच प्रयत्न राहील. – एस. एन. परदेशी, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पालघर