‘फायटोप्थोरा’ रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादकांचे ८० टक्क्य़ांपर्यंत नुकसान; कृषी विभागाकडून बाधित झाडांची पाहणी

लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : डहाणू तालुक्यातील चिकू बागांमध्ये फायटोप्थोरा या बुरशीजन्य रोगाने थैमान घातले असल्याने या रोगामुळे चिकूच्या फळ आणि फुलांची गळती सुरू झाल्याने बागांचे २० ते ८० टक्के नुकसान झाल्याचे पाहणीत आढळले आहे.

अनियमित कोसळणाऱ्या पावसामुळे चिकू बागांमध्ये बुरशीजन्य ‘फायटोप्थोरा’ रोगाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात झाला. या रोगामुळे झाडावरील फळांची गळ होऊन शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या पाश्र्वभूमीवर कोसबाड कृषी विज्ञान केंद्र, दापोली कृषी विद्यपीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने विविध भागातील चिकू बागांना भेटी देण्यात आल्या. कृषी विभागातर्फे चिकू कीडरोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्पांतर्गत प्रत्येक आठवडय़ात बागांना भेटी देऊन कीडरोगाचे सर्वेक्षण करण्यात आले. या महिन्यात फळगळाचे प्रमाण वाढल्याचे प्रकल्पाचे तालुका निरीक्षक सुनील बोरसे यांनी पाहणीनंतर सांगितले. उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप नेरकर, दापोली कृषी विद्यापीठाच्या पालघर येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एस. बी. गंगावणे, प्रा. अंकुश ढाने, प्रा. लहानू गबाले तसेच शास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाणे तसेच प्रभारी तालुका कृषी अधिकारी उमेश पवार आदींनी काही बागांना भेटी दिल्या.

रोगनियंत्रणासाठी उपाययोजना

संत्री, पपई व इतर रोगांमध्ये फायटोप्थोरा बुरशीजन्य रोग झाडाच्या मुळाच्या माध्यमातून पसतो,व झाड मृत पावते. चिकू पिकामध्ये हा रोग फू ल व फळगळतीस कारणीभूत ठरतो. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी चिकू बागांमध्ये आद्र्रता कमी ठेवण्यासाठी पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होणे आवश्यक आहे. यासाठी फळझाडाची दरवर्षी छाटणी करून सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी पोषक वातावरण करणे आवश्यक आहे. बागेत झाडांच्या मुळाच्या पाच मीटर व्यासापर्यंत मातीचा भराव  केल्यास बुडाजवळ पाणी साचल्याने निर्माण होणाऱ्या समस्यांचे प्रमाण कमी होते. जून महिन्यात जैविक बुरशीनाशक तसेच आवश्यकता पडल्यास रासायनिक बुरशीनाशकांची जमिनीवर व झाडांवर फवारणी करणे आवश्यक आहे.