जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय पूर्णत: इतिहासजमा होणार असून, या व्यवसायावर अवलंबून असलेली शेकडो कुटुंबे देशोधडीला लागणार आहेत. मात्र या वस्तुस्थितीची जाणीव असूनही त्याकडे राज्य व केंद्र शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप करून प्रकल्प तात्काळ रद्द करावा, अशी आग्रही मागणी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
राजापूर तालुक्यात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असून या प्रकल्पाला तेथील मच्छीमार, शेतकरी, बागायतदार व ग्रामस्थांचा पूर्वीपासूनच विरोध आहे. प्रवीण गवाणकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या जनहित सेवा समितीच्या माध्यमातून गेल्या ७-८ वर्षांपासून आंदोलन, मोर्चा काढून या प्रकल्पाला विरोध करण्यात येत आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी जनहित सेवा समितीचे अध्यक्ष गवाणकर यांनी आजारपणामुळे या लढय़ातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता प्रकल्प विरोधक थंडावतील, अशी चर्चा सुरू असतानाच वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली जनहक्क सेवा समितीची ग्रामस्थांनी स्थापना केली आणि आंदोलन थंडावले नसल्याचे स्पष्ट झाले. गेल्या १४ नोव्हेंबर या बालदिनी या समितीने हवेत हजारो फुगे सोडून प्रकल्पाला आपला विरोध कायम असल्याचे दाखवून दिले.
त्यानंतर आजच्या जागतिक मासेमारी दिनाचे औचित्य साधून साखरीनाटे परिसरातील मच्छीमारांनी अमजद बोरकर, मन्सूर सोलकर, बाबामियाँ मुकादम, खलील वस्ता यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले. जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्या अनुपस्थितीत हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे यांनी स्वीकारले. मच्छीमार समाजबांधवांच्या भावना शासनाला कळविण्यात येतील, असे आश्वासन बर्गे यांनी यावेळी दिले.