दिगंबर शिंदे

इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा थेट नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये झालेला पराभव धुऊन काढण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीला अद्याप दहा महिन्यांचा अवकाश असतानाही राष्ट्रवादीच्या बूथनिहाय बैठकांचा धडाका सुरू झाला आहे. प्रत्येक बैठकीत जयंत पाटील यांचे थोरले चिरंजीव प्रतीक पाटील यांची आवर्जून असलेली उपस्थिती वारसदार सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. गतवेळच्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये स्व. विजयभाऊ पाटील यांचा चेहरा पुढे होता, यंदा मात्र विनाचेहरा मोर्चेबांधणी सुरू आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजप-शिवसेना यांचे सरकार स्थापन झाले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमध्ये सहभागी झालेल्या सर्वच घटक पक्षांना एकत्र करून इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली. यासाठी आता सरकारच्या पंगतीला बसलेले स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टीसुद्धा त्या वेळी विरोधात होते. त्यांच्यासह माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, महाडिक गट, विक्रम पाटील यांचा भाजपमधील गट, शिवसेना, काँग्रेस या सर्वानी एकत्र येऊन विकास आघाडीच्या माध्यमातून इस्लामपूरची निवडणूक लढवली. पक्षाचा विचार यापेक्षा केवळ जयंत पाटीलविरोधक एवढा एककलमी कार्यक्रम होता. थेट नगराध्यक्ष निवडीमध्ये मात्र इस्लामपूरकरांनी जयंत पाटील यांना नाकारत विकास आघाडीच्या निशिकांत पाटील यांच्या हाती शहराचे सुकाणू सोपवले.

नगराध्यक्ष निवडीमध्ये इस्लामपूरकरांनी राष्ट्रवादीला नाकारले असले तरी प्रभाग सदस्य म्हणजेच नगरसेवक निवडीमध्ये बरोबरीने स्थान दिले. विकास आघाडी आणि राष्ट्रवादी यांना समसमान म्हणजे प्रत्येकी १३ जागा देत सत्तेचा तराजू एकसमान ठेवला. मात्र अपक्ष निवडून आलेल्या दादासाहेब पाटील यांना उपनगराध्यक्ष पद देत आपले पारडे जड राहील याची खबरदारी राष्ट्रवादीने घेतली. यातून गेल्या पाच वर्षांत समर्थ विरोधक असतानाही निशिकांत पाटील यांनी नौका पैलतीरी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र विकास आघाडीमध्येही रुसवेफु गवे कायम राहिले.

नगराध्यक्ष निवडीमध्ये मिळालेल्या यशामुळे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांना थेट आव्हान दिले. मात्र पडद्याआड वेगळेच राजकारण घडले. वाळव्याची जागा शिवसेनेच्या वाटय़ाला गेली आणि सेनेने गौरव नायकवडी या नवख्या तरुणाला मैदानात उतरवले. यामागे माजी राज्यमंत्री खोत यांची ताकद राहिली असली तरी प्रभाव मात्र दिसला नाही. शेट्टी यांनी महायुतीची साथ सोडत राष्ट्रवादीशी जवळीक साधली, तर खोत यांनी रयत क्रांतीच्या नावाने वेगळी चूल कायम ठेवण्याचा प्रयत्न चालविला असून जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पराभूत झालेले पुत्र सागर खोत यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

राजकीय स्थिती बदलली

गेल्या वेळी फडणवीस यांचे सरकार सत्तेवर होते. या वेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. सरकार स्थापनेमध्ये जयंत पाटील यांचे योगदान महत्त्वाचे ठरले असल्याने सत्तेमध्ये त्यांचा शब्द महत्त्वाचा आहे. तरीही गेल्या वेळी गाफील राहिल्याने थेट नगराध्यक्ष निवडीमध्ये झालेला पराभव जिव्हारी लागला होता. त्याची झळ जिल्हय़ात अनेक भागांत बसली.

गेल्या निवडणुकीवेळी सर्व विरोधक एकत्र आले होते.  पाच वर्षांच्या कालावधीमध्ये विरोधकांमध्ये फूट पाडण्यात जयंतराव यशस्वी झाले आहेत.  मात्र पक्षांतही गटबाजी  असून नगरपालिका कोणाच्या ताब्यात देणार यावर पडद्याआड चर्चा सुरू आहे. माजी मंत्री अण्णा डांगे यांचे पुत्र चिमण डांगे, खंडेराव जाधव यांच्यात चुरस आहे. यावर मंत्री पाटील यांच्याकडे उत्तर असणार यात शंका नाहीच. नगरपालिका निवडणुकीला सामोरे जात असताना तीन दशके सत्ता असताना राष्ट्रवादीने काय केले याचे उत्तर द्यावे लागणार आहे. गेल्या पाच वर्षांत शहर सुधारणेसाठी किती वेळ दिला, राजकारणासाठी किती वेळ दिला याचेही उत्तर सत्ताधारी या नात्याने विकास आघाडीला द्यावे लागणार आहे.