राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्यावर त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी ५० कोटी रूपये देऊन मंत्रिपद घेतले, असा आरोप शिवस्वराज्य यात्रेच्या व्यासपीठावरून केला होता. या आरोपाला रोजगार हमी योजना फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिले. हा आरोप म्हणजे बालिशपणाच आहे. पैशाने कधीही पद विकत घेता येत नाही. नशेत बोलणाऱ्यांच्या आरोपांना मी उत्तर देत नाही, अशी खोचक टीका त्यांनी केली.

मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी बीडमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत बोलताना टीका केली होती. आमच्या काकांनी ५० कोटी रूपये देऊन मंत्रिपद घेतले. इतके पैसे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी लावले असते तर जिल्ह्याचा चेहरा बदलला असता. सत्तेचा वापर संपत्ती जमवण्यासाठी केला म्हणूनच देशासह परदेशातही जयदत्त आणि भारतभूषण या दोन्ही भावांनी संपत्ती घेतली, असा आरोप त्यांनी केला होता. अण्णा तुम्ही कार्यकर्त्यांना म्हणालात की घड्याळ काढून धनुष्यबाण हाती धरा. पण तुमचे वय आता ७५ झाले आहे. या वयात धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला तर बरगड्या तुटतील. आम्हाला वानरसेना म्हणून हिणवता. तुमच्यासारख्या रावणाची लंका हीच वानरसेना जाळल्याशिवाय राहणार नाही, असा टोला संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांना लगावला.

संदीप क्षीरसागर यांनी केलेले आरोप जयदत्त क्षीरसागर यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले, पैशाने पद विकत घेता येत नाही. त्याचबरोबर नशेत बोलणाऱ्यांचे आरोपही गांभीर्याने घेण्यासारखे नाहीत. मी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मला मंत्रिपदाची संधी मिळाली. माझ्या राजकीय जीवनात चरित्र आणि चारित्र्य दोन्ही गोष्टींना महत्व देतो. त्यामुळे निरर्थक आरोपांवर बोलणार नाही. त्यांनी केलेला आरोप केवळ बालिशपणा असून तो जनतेसमोर आला आहे, अशा शब्दात त्यांनी संदीप क्षीरसागर यांना उत्तर दिले.