विश्वाला अभिमान वाटेल असे सुंदर पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आहे. सिंधुदुर्ग विजयदुर्ग असे दुर्ग या जिल्ह्य़ात आहेत. सुंदर सागरी किनारे आहेत. मालवणी जेवण, फळांचा राजा हापूस आंबा, काजू, कोकम ही फळे आहेत. या सर्वाबरोबरच जिल्ह्य़ाच्या पर्यटनाचे बॅण्डिंग आवश्यक आहे. ऑगस्ट महिन्यात हेलियम डे साजरा केला जातो. या अनुषंगाने विजयदुर्गचे बॅण्डिंग होण्यासाठी हेलियम डे ला विजयदुर्ग दिनाचे जोड देऊन महोत्सवाचे आयोजन पर्यटन विभागामार्फत आयोजनाचा प्रयत्न करू, अशी ग्वाही पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी विजयदुर्ग येथे बोलताना दिली.

पर्यटनमंत्री रावल यांनी काल भर दुपारच्या उन्हात सुमारे पाऊण तास विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला. या भेटीच्या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार सर्वश्री प्रमोद जठार, अजित गोगटे, राजन तेली, संदेश पारकर, सभापती जयश्री आडिवरेकर, उपसभापती संजय देवरुखकर, पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गोविंद राज, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, वरिष्ठ व्यवस्थापक सुबोध किन्हळेकर, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, प्रकल्प संचालक दीपक माने, किरण सुलाखे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, तहसीलदार वनिता पाटील, इतिहासप्रेमी राजेंद्र परुळेकर, ग्रामस्थ उपस्थित होते.

देवगड किल्ल्याची पाहणी

विजयदुर्ग किल्ल्याच्या पाहणीनंतर पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी देवगड किल्ल्याला भेट दिली. स्वदेश दर्शन अंतर्गत ६ कोटी ४७ लक्ष रुपयांची विविध विकासकामे या देवगड किल्ल्यावर होणार असल्याची त्यांनी माहिती दिली. देवगड किल्ल्यावर निरीक्षण मनोरा, माहिती केंद्र, उपाहारगृह आदी सुविधा पर्यटकांसाठी होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यानंतर मोंड येथील गुरुनाथ मोंडकर यांच्या साई बोटिंग सव्‍‌र्हिसचा शुभारंभ पर्यटनमंत्री रावल यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवगड बंदर जेटी येथे करण्यात आला. या बोटीतून उपस्थित सागर सफारीही केली.

कुणकेश्वर पर्यटन संकुलाचे लोकार्पण

कुणकेश्वर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पर्यटन संकुलाचे लोकार्पण पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. कुणकेश्वर पर्यटन संकुलप्रमाणे जिल्ह्य़ात आठ ठिकाणी पर्यटन महामंडळामार्फत पर्यटक संकुल उभारले जात असल्याचे स्पष्ट करून पर्यटनमंत्री रावल या वेळी बोलताना म्हणाले की, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सिंधुदुर्गात निसर्ग सौंदर्याचे बॅण्डिंग करायला हवे. हिमालयातील बर्फ वगळता अन्य सर्व निसर्ग सौंदर्य या जिल्ह्य़ात आहे. पर्यटनातून सर्वाधिक रोजगार संधी उपलब्ध होतात.

यानंतर मिठबांव येथील नियोजित पर्यटन संकुलास भेट देऊन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी या प्रकल्पांतर्गत उभ्या राहत असलेल्या विविध इमारतींची पाहणी केली.