पुण्यातील भीमा कोरेगाव हिंसाचाराशी जिग्नेश मेवाणीचा संबंध नाही. या हिंसाचारामागे त्याचा हात असल्याचा जो अंदाज व्यक्त होतो आहे त्यात काहीही तथ्य नाही अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. एकीकडे चिथावणीखोर भाषण दिल्याप्रकरणी जिग्नेश मेवाणीविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहेत. तर रामदास आठवले यांनी त्याला क्लिन चीट देऊन टाकली आहे. १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायांवर दगडफेक झाली. त्यामुळे मोठा हिंसाचार उसळला तसेच ३ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदही करण्यात आला. मात्र जो हिंसाचार उसळला त्याला जिग्नेश मेवाणी जबाबदार नसल्याचे आता रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

भीमा कोरेगाव आणि शेजारच्या गावांमध्ये काहिशी तणावाची परिस्थिती होती. मात्र जिग्नेश मेवाणीने केलेल्या भाषणामुळे तणाव निर्माण झाला हे आपल्याला मान्य नाही असेही आठवले यांनी म्हटले आहे. जिग्नेश मेवाणीने पुण्यातली शनिवाराडा या ठिकाणी झालेल्या एल्गार परिषदेत भाषण केले होते त्याचा संबंध भीमा कोरेगावशी कसा काय जोडता येईल? असाही प्रश्न रामदास आठवलेंनी विचारला. काही संघटनांनी रात्री बैठक घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हिंसाचार घडवून आणला असाही आरोप आठवले यांनी केला.

भीमा कोरेगाव या ठिकाणी उसळेल्या हिंसाचारासंदर्भात आणि या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्या दोषींसंदर्भात आपण त्वरित पावले उचलावीत. दोषींना पकडून कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचेही आठवले यांनी सांगितले. १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव या ठिकाणी हिंसाचार उसळला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २ जानेवारीला मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. या घटनेचे पडसाद मुंबईत आणि मराठवाड्यातही २ जानेवारीला उमटले. तर प्रकाश आंबेडकरांनी ३ जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. ज्यानंतर हा बंद पाळण्यात आला होता. तसेच या प्रकरणी जिग्नेश मेवाणीविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याचा गुन्हाही पोलिसांनी दाखल केला. मात्र आता या सगळ्या प्रकरणात जिग्नेश मेवाणीचा काहीही दोष नसल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.