शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांसह 70 जणांच्या अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अडचणीही वाढण्याची चिन्हं आहेत. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन यावर आपला संताप व्यक्त केला आहे. ” परवा फडणवीस म्हणतात पवारांना संपवणार आणि आज ईडी पवारांवर केस दाखल करते! याचा अर्थ कळतो काय महाराष्ट्रा? ” असा प्रश्न उपस्थित करत जितेंद्र आव्हाड यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध नोंदवला आहे. तसेच हे सगळे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चालले आहे असाच आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

काही वेळापूर्वीच शिखर बँकेच्या 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह 70 जणांवर ईडीने गु्न्हा दाखल केला आहे. गेल्या चार वर्षांपासून या प्रकरणात कोणतीही घडामोड झाली नाही. आता ईडीने निवडणुकीच्या तोंडावर गुन्हा दाखल केल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते चांगलेच संतापले आहेत. त्याचनुसार त्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. राज्य सरकार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही सगळी कारवाई करत आहे असाच आरोप केला जातो आहे.