विनयभंगाच्या गुन्हय़ाखाली अटकेत असलेले आमदार राजेश क्षीरसागर यांना शुक्रवारी न्यायालयात दाखल केले असता ३ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आमदार क्षीसागर यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज उपोषण करण्यात आले. तर आज आमदार क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून अन्नत्याग सत्याग्रह मागे घेतला. तर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आमदार क्षीरसागर यांच्याबाबत पोलिसांनी केलेली कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा देत ज्यांना आपण निर्दोष आहोत असे वाटते त्यांनी न्यायालयात दाद मागावी असे विधान येथे पत्रकारांशी बोलताना केले.    
गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये घडलेल्या गोंधळाबाबत कोल्हापूर पोलिसांनी अटकसूत्र सुरू केले आहे. त्याअंतर्गत काल शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांना पोलीस कर्मचा-यांचा विनयभंग केल्याच्या कलमाखाली अटक केली. क्षीरसागर यांना काल न्यायालयात दाखल केले असता एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे शुक्रवारी पोलिसांनी आज पुन्हा आमदार क्षीरसागर यांना न्यायालयासमोर उभे केले. प्रथमवर्ग न्यायाधीश  ए. एम. ताम्हाणे यांनी क्षीरसागर यांच्यावरील दोषारोपाचे स्वरूप पाहता ते आपल्या कक्षेत येत नसल्याने सत्र न्यायालयाकडे दाद मागावी लागणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी क्षीरसागर यांना तीन दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आता सोमवारी क्षीरसागर यांना सत्र न्यायालयासमोर जावे लागणार आहे.    
कालपासून आमदार क्षीरसागर यांनी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला होता. तो आज दुपापर्यंत कायम राहिल्याने त्यांची प्रकृती काहीशी क्षीण झाली आहे. प्रकृतीचे स्वरूप पाहून आज त्यांना इस्पितळात दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. तर क्षीरसागर यांच्या अन्नत्याग सत्याग्रहची नोंद मातोश्रीवरूनही घेतली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार नीलम गोऱ्हे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. याबाबतीत अंतिम विजय न्यायाचाच होणार असून, आमदार क्षीरसागर यांच्यासह अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांनी अन्नत्याग सत्याग्रह स्थगित करावा असे आवाहन केले होते. त्यानुसार आमदार गोऱ्हे यांनी आमदार क्षीरसागर यांच्यासह अटक असलेल्या कार्यकर्त्यांना ठाकरे यांच्या आदेशाची माहिती दिली. त्यानंतर क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांनी अन्नत्याग सत्याग्रह स्थगित केला आहे, असे आमदार गोऱ्हे यांनी पत्रकाद्वारे सांगितले.    आमदार क्षीरसागर यांच्यावर पोलिसांनी आकसापोटी कारवाई केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे तसेच चंद्रकांत पाटील, राजन साळवी, चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर हे चार आमदार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, मुरलीधर जाधव, भाजपचे महेश जाधव, बजरंग पाटील, शुभांगी साळोखे, पूजा भोर, वैशाली क्षीरसागर आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजाराम माने यांची भेट घेतली. पोलिसांनी आमदार क्षीरसागर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जाणार नाही असे आम्हाला सांगितले होते. पण प्रत्यक्षात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये क्षीरसागर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा लावला आहे. याबाबत पोलिसांनी युतीची दिशाभूल केली असून, त्यांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
हिंदुत्ववादी संघटनांची आज महाआरती
आमदार क्षीरसागर यांच्यासह १५ कार्यकर्त्यांवर झालेल्या कारवाईच्या विरोधात भाजप-शिवसेनेसह हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी महासंघ यांच्या वतीने आंदोलन केले जात आहे. याअंतर्गत उद्या शनिवारी ११ वाजता बिनखांबी गणेश मंदिर येथे महाआरती करण्यात येणार असून उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदुधर्म संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.