सुमारे १८ तासांनी कशेडी घाटातील वाहतूक एकेरी सुरु झाली आहे. कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग मागील १८ तासांपासून ठप्प झाला होता. अखेर या मार्गावरची एकेरी वाहतूक सुरु झाली आहे. काल रात्री कशेडी घाटात दरड कोसळली त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला होता. ही दरड हटवण्याचं काम रात्रभर आणि दिवसभर सुरु आहे. अशात आता हा मार्ग एकेरी सुरु झाला आहे.

तब्बल १८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर मुंबई गोवा महामार्गावरील दरड हटविण्यात प्रशासनाला यश आले आहे. या मार्गावरून एकेरी वाहतुक सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्यां प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलादपूर जवळील कशेडी घाटात धामणादेवी जवळ ही दरड गुरुवारी संध्याकाळी कोसळली होती. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतुक बंद पडली होती. महामार्ग प्राधिकरण, स्थानिक प्रशासन आणि पोलीसांच्या मदतीने रात्री उशीरा दरड हटवण्याचे काम सुरु करण्यात आले.

शुक्रवारी सकाळी हे काम पुर्ण होईल अशी अपेक्षा होती. मात्र सकाळी हे काम पुर्ण होत आले असतांना पावसाचा जोर पुन्हा वाढला त्यामुळे मातीचा ढिगारा पुन्हा खचून रस्त्यावर आला. यानंतर पुन्हा एकदा दरड हटवण्याचे काम नव्याने सुरु करण्यात आले. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हे काम पुर्ण झाले. मात्र खबरदारी म्हणून याठीकाणी एकेरी वाहतुक सुरु करण्यात आली आहे. पावसाचा जोर कमी झाल्यावर उर्वरीत काम पुर्ण करून दुहेरी वाहतूक सुरु करण्यात येणार आहे.