पाथरी येथील जाहीर सभेत कन्हैयाकुमारची टीका

परभणी : देशातील जनतेच्या भावनेशी सध्या राजकारण खेळले जात असून द्वेषाच्या आधारावर दिवस-रात्र िहदू-मुस्लीम अशी विभागणी करून बेरोजगारी, शेतमालाच्या किमतीचा प्रश्न याकडे डोळेझाक केली जात आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे आगीत तेल ओतण्याचा प्रकार असल्याची टीका ‘जेएनयू’ मधील युवा नेता कन्हैयाकुमार याने मंगळवारी केली.

पाथरी येथील जिल्हा परिषद मदानावर मंगळवारी आयोजित जाहीर तो बोलत होता. यावेळी आयोजक आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यासह राजन क्षीरसागर, राजेश विटेकर, दादासाहेब टेंगसे आदींसह विविध राजकीय, सामाजिक कार्यकत्रे व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी कन्हैयाकुमार याने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर कठोर टीका केली.  देशात काळे धन बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी लागू करण्यात आल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. आताही घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी ‘एनआरसी’ कायदा असल्याचे भासवले जात आहे. ज्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे तेथे लोक कामधंद्यासाठी जातात. भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेली असताना कोण कशाला इकडे येईल, असा प्रश्नही यावेळी कन्हैयाकुमार याने उपस्थित केला.  यावेळी प्रास्ताविकात आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी मुस्लीम समाजाने नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करताना महात्मा गांधींच्या मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन केले.

तरुणांच्या हाताला रोजगार नाही, शेतीमालाच्या दराचा प्रश्न आहे. मात्र यावर बोलले की तुमच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले जाते. देशामध्ये विद्वेषाचे वातावरण पसरविण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा वापरला जात आहे. विविधता हे भारताचे बलस्थान आहे. देशात धर्माच्या नावावर वाटण्या करणाऱ्या इंग्रजांची अवस्था वाईट झाली याचे कारण भारतातल्या लोकांनी ही बहुविविधता जिवंत ठेवली हे आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा हा कोणाला नागरिकत्व देण्याऐवजी नागरिकत्व हिसकावून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जन्माला घातला आहे. हा कायदा आवश्यक आहे हे उभे  राहून सांगण्याची हिंमत सरकारमध्ये नाही, अशी टीकाही कन्हैयाकुमार याने केली.