यवतमाळ : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधाचा कांगावा करीत यवतमाळातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी  बुधवारी रात्री काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केली. या मारहाणीची चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. युवा सेनेने मात्र हल्ल्याचा इन्कार केला असून, जर हल्लेखोर कार्यकर्ते आमचे असतील, तर त्यांच्यावर कारवाई करू, असे जाहीर केले आहे.

यवतमाळातील वाघापूर परिसरातील वैभवनगर येथे बुधवारी रात्री १० ते १५ तरुणांनी काश्मिरी विद्यार्थ्यांवर ‘वंदे मातरम, भारत माता की जय’ हे नारे म्हणण्याची सक्ती केली. उमर नजीर, उमर रशीद, तजीमुल्ला अली, ओवस मुस्ताक, आमीर मुलाद अशी मारहाण झालेल्या काश्मिरी युवकांची नावे आहेत. याप्रकरणी काश्मिरी विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. येथील डायाभाई पटेल शारीरिक शिक्षण महाविद्यालयात हे काश्मिरी विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यवतमाळातील विविध महाविद्यालयांमध्ये सुमारे ७० ते ८० काश्मिरी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. लोहारा परिसरात हे महाविद्यालय असल्याने बहुतांश विद्यार्थी लोहारा, वैभवनगर या भागांत राहतात. बुधवारी रात्री काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बाजारातून परतले. यातील काही विद्यार्थी जेवण करण्यासाठी भोजनालयात गेले. तिथे अचानक १० ते १५ तरुण पोहोचले. त्यांनी तुम्ही काश्मिरी आहात का, तिथल्या दहशतवाद्यांशी तुमचे काय नाते आहे, येथे कशाला आला आहात, अशा प्रश्नांची सरबत्ती करून मारहाण सुरू केली. यवतमाळात शिकत असलेल्या सर्व काश्मिरी विद्यार्थ्यांनी चार दिवसांत शहर सोडून काश्मिरात परत जावे, अन्यथा भयंकर परिणाम होतील, असा धमकीवजा इशाराही  या विद्यार्थ्यांना देण्यात आला. हा संपूर्ण प्रसंग फेसबुकवर थेट प्रसारितही करण्यात आला. मात्र यात मारहाण करणाऱ्यांचे चेहरे दिसत नाहीत. तक्रारकर्त्यांनी  दिलेल्या वर्णनावरून आरोपींची शोधमोहीम सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती लोहारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक धर्मराज सोनुले यांनी दिली.

.. तर कारवाई करू

यवतमाळात पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मिरी युवकांना झालेली मारहाण चुकीची आणि निषेधार्ह आहे. या कृत्यात युवासेनेचे कार्यकर्ते सहभागी असल्याचे आढळल्यास युवसेना त्यांच्यावर कारवाई करील. आम्ही देशभक्त काश्मिरी तरुणांना आपल्या भावांप्रमाणे मानतो आणि युवासेना नेहमी त्यांच्याबरोबर उभी राहील, अशी प्रतिक्रिया युवासेनेने दिली आहे.

आम्ही कुठे जावे?

या घटनेने आम्ही प्रचंड हादरलो आहोत. काश्मीरमधील परिस्थितीमुळे तिथे शिकता येत नाही. तेथील दहशतवादी कारवायांमुळे काश्मीरबाहेर आमच्याकडे संशयाने बघितले जाते. त्यामुळे बाहेरही शिकण्याचे मार्ग बंद होत आहेत. अशा स्थितीत आम्ही कुठे जायचे, असा प्रश्न उमर रशीद याने उपस्थित केला.