केबीसी, साईकृपा प्रकरणात फसवणूक झाल्याच्या चच्रेला अजून विराम मिळाला नसतानाच आता जयभारत मल्ट्रिटेड अॅण्ड लँड डेव्हलपर्स कंपनीने वसमत तालुक्यातील ग्राहकांना सुमारे ४ कोटींना गंडवल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी िहगोलीत तपास करून कंपनीचे काही साहित्य जप्त केले. पोलीस आता कंपनीच्या उपकार्यालयातील अध्यक्ष, सचिवांचा शोध घेत आहेत.

जिल्ह्यात यापूर्वी दामदुप्पट रक्कम व वस्तू, दागदागिन्यांचे आमिष दाखवून केबीसी कंपनीने सुमारे २०० कोटी, तर साईकृपाने दीड ते दोन कोटी रुपयांना गंडवण्यात आले. िहगोली, वसमत, औंढा तालुक्यांतील ग्राहकांची यात मोठी फसवणूक झाली. िहगोली शहरात साईकृपा कंपनीच्या जयश्री हांडेकर, वीरभद्र हांडेकर, रॉबर्ट बांगर आदींवर गुन्हा दाखल झाला. मात्र, या प्रकरणाचा विसर पडतो न पडतो, तोच आता नव्याने प्रकरण उघडकीस आले आहे. नांदेडच्या जयभारत मल्ट्रिटेड अॅण्ड लँड डेव्हलपर्स वसमतसह तालुक्यातील शेकडो ग्राहकांना सुमारे ४ कोटींचा गंडा घातल्याचे हे प्रकरण आहे.
गेल्या ४ वर्षांपासून या कंपनीने नांदेड येथे मुख्य कार्यालय सुरू केले. लातूर व िहगोली येथे त्यांची उपकार्यालये आहेत. कंपनीचे अध्यक्ष गणपत आडे व सचिव विजयकुमार राठोड यांनी वसमत तालुक्यात या कंपनीचे एजंट तयार केले. सुरुवातीला एजंटसह ग्राहकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन सेमिनार घेतले. तीन वर्षांत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे शेकडो ग्राहक याला बळी पडले. वसमतसह तालुक्यात जवळपास ९० एजंटांनी आपल्या नातेवाइकांसह अनेकांना कंपनीत गुंतवणूक करण्यास तयार केले. सुरुवातीला काही जणांना परतावादेखील मिळाला.
परतावा मिळाल्याने अनेक लोक आमिषाला बळी पडले, मात्र आता ही रक्कम परत मिळणे कठीण झाल्याने ग्राहक एजंटांच्या घरासमोर चकरा मारून थकले आहेत. कंपनीने नांदेड येथील कार्यालय बंद केले आहे. त्यामुळेच या प्रकरणात फसवणूक झाल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आर. आर. सावंत फौजफाटय़ासह िहगोली शहरातील बांगरनगर येथे आले होते. त्यांनी कार्यालयाचे साहित्य जप्त केले. जिल्ह्यात नेमके किती ग्राहकांना गंडावले, याचा आकडा अजून उघड झाला नाही. मात्र, नांदेडचे पोलीस कंपनीचे अध्यक्ष गणपत आडे व सचिव राठोड यांचा शोध घेत असल्याने पुन्हा िहगोलीत दामदुप्पट रकमेची चर्चा सुरू झाली आहे.