विविध मागण्यांसाठी निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा सोमवारी मुंबईत धडकला. आझाद मैदानावरुन हे शेतकरी आता विधान भवनावर धडकणार आहेत. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला असून या मोर्चाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने पाठिंबा दर्शवला आहे.

गारपिटीमुळे उभ्या पिकाचा घास हिरावला गेलेले शेतकरी.. बोंडअळीमुळे नुकसानग्रस्त झालेले कापूस उत्पादक.. समृद्धी महामार्गात जमिनीवर पाणी सोडावे लागणारे भूमालक.. नद्याजोड प्रकल्पात विस्थापित झालेले तसेच वनजमिनीपासून वंचित झालेले शेतकरी अशा समदु:खाने पोळलेल्या पालघर, ठाणे, अहमदनगर, परभणी, औरंगाबाद, नंदुरबार, सांगली, पुणे, कोल्हापूर, नांदेड या जिल्ह्यातील हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. सुमारे ३० हजार शेतकरी या मोर्चात सहभागी झाल्याचे सांगितले जाते. मात्र, हा मोर्चाला नेमका का निघाला, काय आहेत या शेतकऱ्यांच्या मागण्या याचा घेतलेला हा आढावा…

> शेतीमालाला दीडपट भावाची हमी द्यावी.

> कसत असलेल्या वन जमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात.

> राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे यासाठी नार-पार, दमणगंगा, पिंजाळ नद्यांचे अरबी समुद्राला वाहून जाणारे पाणी अडवीत पूर्वेकडील गिरणा, गोदावरी खोऱ्यात वळवावे.

> गुजरात राज्याच्या फायद्याचा नद्याजोड प्रकल्प रद्द करावा.

> संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचा गरजू आणि पात्र व्यक्तींना तत्काळ लाभ द्यावा.

> ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांच्या जुन्या शिधापत्रिका बदलून द्याव्यात.

> शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी.

> शेतकऱ्यांची वीजदेयके माफ करावी, शेतकऱ्यांना चोवीस तास वीज, पाणी उपलब्ध व्हावे.

> प्रत्येक कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काचे घर मिळावे.

> स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी.