काँग्रेसच्या विचारसणीत आपले जीवन व्यतीत केलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिराला हजेरी लावली. संपूर्णपणे विरोधी विचारसरणी असलेल्या संघाच्या व्यासपीठावर मुखर्जींच्या हजेरीमुळे काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली होती. तसेच अनेकांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, संघाकडून मुखर्जींच्या उपस्थितीबाबत प्रतिक्रिया देताना संघ नेहमीच विद्वानांचा आदर करतो असे सांगण्यात आले.

प्रणव मुखर्जी संघाच्या व्यासपीठावरुन नक्की काय बोलतील याची सर्वांना उस्तुकता लागून राहिली होती. मात्र, त्यांनी नेहमीप्रमाणे आपली स्पष्ट मतं यावेळी मांडली. काय होते त्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे जाणून घ्या.

प्रणव मुखर्जींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :

१) राष्ट्रवाद हा कोणत्याही भाषा, रंग, जात, धर्माशी संबंधित नसतो. देशाप्रति प्रत्येकाने सच्ची निष्ठा बाळगणे हीच खरी देशभक्ती आहे. आपल्या देशाचा राष्ट्रवाद हा भाषा, धर्म आणि प्रांतापलिकडचा असल्याचे मुखर्जी यांनी म्हटले आहे. त्यामुळे हिंदुत्व हाच राष्ट्रवाद ही संघाची भुमिका त्यांनी नाकारली.
२) देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यात अनेकांचे योगदान होते. त्यामुळे भारतातील विविधता आणि त्यातील एकता हेच आपल्या देशाचे सौंदर्य असून ते जपायला हवे.
३) ५ हजार वर्षांनंतरही भारताची सहिष्णुतेची ही संस्कृती टिकून राहिली आहे आणि ती पुढेही टिकून रहावी. भारतातील सहिष्णुता आणि वैविध्यतेचा सन्मान व्हायलाच हवा, अशी आग्रही मांडणी त्यांनी केली.
४) संपूर्ण जग हे कुटुंब असल्याची उदार भावना भारतीयांच्या संस्कारात आहे. भारतीय संस्कृतीने जगाला कुटुंब मानले आहे. त्यामुळे वसुधैव कुटुंबकम् हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. म्हणूनच भारत हा एक अखंड आणि स्वतंत्र समाज असल्याचे मुखर्जी यावेळी म्हणाले.
५) संघाच्या व्यासपीठावर असतानाही संघाच्या कर्तुत्वाची नव्हे तर भारतासंदर्भात त्यांनी आपली भुमिका मांडली.
६) भारताच्या संविधानामुळे राष्ट्रीय भावना दृढ होते. त्यामुळे संविधानाची प्राणपणाने जपणूक केली पाहिजे अशी भुमिका त्यांनी मांडली.
७) भारतात सम्राट अशोक, सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या सम्राज्यासारखी अनेक मोठी सम्राज्ये होऊन गेली. तसेच महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्यासह अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान दिले, त्यामुळे त्यांना विसरून चालणार नाही.