भंडारा जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्याच्या कोअर क्षेत्रात मुदतबाह्य औषधांचा साठा सापडल्यामुळे वनविभागात खळबळ उडाली आहे. वाघांचा संचार असलेल्या या क्षेत्रात गेल्या चार-पाच दिवसांपासून ही औषधे पडून आहेत. मात्र, गस्तीदरम्यान वनकर्मचाऱ्यांना हा साठा दिसला नाही, तर एका स्वयंसेवीने ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिल्यामुळे वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
न्यु नागझिरा अभयारण्याला लागून असलेले कोका वन्यजीव अभयारण्य काही महिन्यांपूर्वीच घोषित झाले. या अभयारण्यात वाघ आणि इतर वन्यजीवांचा मोठय़ा संख्येने संचार आहे. याच अभयारण्यातून मोठा रस्ता जात असून आजूबाजूला काही गावेही आहेत. त्यामुळे अभयारण्य जरी असले तरीही अभयारण्याचा सीमेवर कायम वर्दळ असते. याचा फायदा घेत काहींनी अभयारण्याच्या कोअर क्षेत्रात मुदतबाह्य औषधे व इंजेक्शनचा साठा आणून टाकला. अभयारण्यात फिरत असलेल्या काही स्वयंसेवींच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी वनविभागाला सूचना दिली. गेल्या चार-पाच दिवसांपासून ही औषधे या परिसरात पडून असतानासुद्धा गस्तीवरील कर्मचाऱ्यांना ती का दिसू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्वयंसेवींच्या सूचनेवरून हे कर्मचारी त्या ठिकाणी गेले तरीही त्यांना तो साठा दिसला नाही. अखेरीस एका स्वयंसेवीने त्यांना तो साठा दाखवला. विशेष म्हणजे, गेल्या तीन-चार दिवसांपासून या साठय़ापासून अवघ्या ५० मिटर अंतरावर वाघाचा नियमित संचार आहे. हरीण आणि इतर जनावरेही या परिसरात आहेत. अशा परिस्थितीत ही औषधे त्यांच्या खाण्यात आली असती तर त्यांचा निश्चितच मृत्यू झाला असता. त्यामुळे वन्यजीवांच्या रक्षणाबद्दल वनकर्मचाऱ्यांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले असून ती औषधे गोळा करण्यात आली आहेत. यासंदर्भात विभागीय वनाधिकारी अशोक खुणे यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.