रत्नागिरी जिल्ह्य़ाला एक चांगली परंपरा आहे. येथील प्रत्येक लहान-सहान गोष्टीला एक चांगला दर्जा आहे आणि म्हणून या परंपरेला, दर्जाला कुठेही धक्का, गालबोट लागणार नाही, याची विशेष काळजी बांधकाम व्यावसायिकांनी घ्यावी. बांधकामाचा दर्जा उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्री भास्करराव जाधव यांनी केले. या वेळी त्यांनी बांधकाम व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण केले जाईल, असे आश्वासनही दिले.
रत्नागिरी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स असोसिएशन व क्रेडाई यांच्या वतीने आयोजित ‘कोकण वास्तू-२०१२’ महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
या वेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी राजीव जाधव, अभिनेत्री अमृता सुभाष, बिल्डर्स असो.चे अध्यक्ष बशीरभाई मुर्तुझा, कार्याध्यक्ष महेंद्रशेठ जैन, प्रकाश डिंगणकर, महेश नवाथे, दीपक साळवी, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, मुंबई, पुणे आदी मोठय़ा शहरांमध्ये अशी भव्य-दिव्य प्रदर्शने होतात. मात्र रत्नागिरीसारख्या लहान शहरात भरवलेले हे वास्तू प्रदर्शन निश्चितच प्रेरणादायी आहे. अशा महोत्सवातून, प्रदर्शनातून नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञान, नवनवे प्रकल्प यांची माहिती मिळते. त्यामुळे नैराश्याने ग्रासलेल्या एखाद्याला घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा आक्मविश्वास मिळतो.
रत्नागिरी शहरामधील विकासासंदर्भात शासनाने तयार केलेली नियमावली वाट्टेल ते झाले तरी रत्नागिरी करांच्या जी फायद्याची असेल तीच मंजूर करून घेण्याचा आपला प्रयत्न असेल, अशी नि:संदिग्ध ग्वाहीही त्यांनी दिली.
जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनीही बांधकाम व्यावसायिकांना ‘एक खिडकी’ योजना सुरू करण्याबरोबरच संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे व त्यांना वारंवार खेपा मारायला लागणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. या वेळी बशीर मुर्तुझा, महेंद्र जैन, सुरेश सुर्वे, बाळासाहेब शेटय़े आदींची समयोचित भाषणे झाली.