महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात महाराष्ट्राच्या भूभागात मराठी भाषिक शिक्षण संस्था सुरू करण्यात येणार आहेत. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली. सामंत हे आज (शनिवार) कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. सकाळी त्यांनी शिवाजी विद्यापीठात आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

“सीमाभागातील मराठी शिक्षण घेणाऱ्यांची मोठी अडचण आहे. ती दूर होण्यासाठी महाराष्ट्रात मराठी भाषिक शिक्षण संस्था सुरू करण्याच्या दृष्टीने आज चाचपणी केली. यासाठी शिवाजी विद्यापीठाला प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना यासाठी सुमारे पाच एकर जागा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. त्यानंतर या कामाला गती देण्यात येईल,” असे सामंत यांनी नमूद केलं.

रिक्त पदे भरण्यास मान्यता
राज्यातील प्राध्यापकांची २७ हजार रिक्त पदे भरण्याला शुक्रवारीच शासनाने मान्यता दिली आहे. विद्यापीठांनी रिक्त पदे भरण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध करायला हरकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवाजी विद्यापीठाला सुवर्ण महोत्सव वर्षासाठी सहा वर्षांपूर्वी ५० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी साडे चार कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. उर्वरित निधी मिळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन सामंत यांनी दिले.