करोना विषाणुच्या संकटामुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला असला, तरी या रोगाला प्रतिकार करणाऱ्या साधनांची निर्मिती हा आर्थिक प्राप्तीचा एक मार्ग उपलब्ध झाल्याचे दिसत आहे. त्यातून कोल्हापूर जिल्ह्यात ३०५  स्वयं-सहाय्यता समुहांकडून तब्बला साडेपाच लाख मास्कची निर्मिती करण्यात आली असून, आतापर्यंत ७१ लाख रुपयांच्या मास्कची विक्री करण्यात आली आंहे. त्यांची ही कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.

मास्क विक्री करण्याच्या उपक्रमात कोल्हापूर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात येते आहे. टाळेबंदीत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून, जिल्ह्यातील स्वयं-सहाय्यता समुहांना मास्क निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. काळाची पावले ओळखत स्वत:मध्ये बदल घडवण्याचे काम जिल्ह्यातील स्वयं-सहाय्यता समुहातील महिलांनी केले आहे.

बाजारातील मागणी आणि पुरवठा याचे गणित समजावून घेत, या महिला सदस्यांनी संधीचा फायदा करून घेतला. मागील ६४ दिवसांत मिळालेल्या संधीचे सोने करत जिल्ह्यातील ३०५ समुहातील १ हजार ३०१ महिला सदस्यांनी  साडेपाच लाख मास्कची निर्मिती आजअखेर केली आहे. त्यातून ७१ लाख ३५ हजार रूपयांची विक्री देखील झाली आहे. कागलमधील समुहाने सर्वाधिक म्हणजे अडीच लाख मास्कची  विक्री केली आहे.

या मास्कची खरेदी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानेही केली आहे. बाजारापेक्षा अत्यंत कमी किंमतीत पण दर्जेदार असणाऱ्या या मास्कची मागणी आता वाढत आहे. ‘करोनासारख्या महामारीच्या युध्दात महिलांनीही समाज आणि कुटुंबाला लावलेला हातभार यशस्वी ठरत आहे. यातही आपण मागे नाही, असाच संदेश जिल्ह्यातील महिलांनी कृतीद्वार दिला आहे’, असे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी आज पत्रकारांना सांगितले