गेला महिनाभर आकांडतांडव सुरू असलेल्या गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा अवघ्या दोन मिनिटांत प्रचंड गदारोळात आटोपली. उल्लेखनीय म्हणजे वादग्रस्त ठरलेल्या संघ बहुराज्य करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यावरून सभेत जोरदार वाद झाला. दरम्यान, मंचाच्या दिशेने चप्पल, चिवडा, दुधाच्या पिशव्या, क्रेट काही प्रमाणात दगड फेकले गेले. प्रचंड तणाव निर्माण झाला, अशातच राष्ट्रगीत सुरू करण्यात आले. त्यानंतर सभा संपल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर सत्ताधारी गटाने संघाच्या बहुराज्य करण्याच्या प्रस्तावास मंजूरी मिळाल्याचा दावा केला. तर, विरोधकांनी हा ठराव नामंजूर झाल्याचे सांगितले.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) यंदाची वार्षिक सर्वसाधारण सभा गाजत आहे. जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या संघाला बहुराज्य दर्जा देण्यावरून सत्तारूढ आणि विरोधकांत महिनाभर आरोप-प्रत्यारोपाची राळ उठली होती.

रविवारी सकाळपासूनच सभासदांची सभास्थानी गर्दी झाली होती. सभेच्या ठिकाणी बसण्यास जागा उपलब्ध नाही, त्यावरून वादाची ठिणगी पडली. सभेसाठी आलेल्या दूध संस्था प्रतिनिधींनी कोठे बसायचे, असा सवाल गोकुळच्या प्रवेशद्वारात आमदार सतेज पाटील, आमदारहसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके यांनी आयोजकांकडे केला.

तर इकडे, अकरा वाजता सभेस सुरुवात झाली. अध्यक्ष विश्वास पाटील यांनी विषय पत्रिकेवरील १ ते १२ विषय मंजूर का, अशी विचारणा केली. समर्थकांनी मंजूर तर विरोधकांनी नामंजूरच्या घोषणा दिल्या. याचवेळी सतेज पाटील, चंद्रदीप नरके, हसन मुश्रीफ, संजय मंडलिक यांनी सभास्थानी धाव घेतली. कृती समितीच्या हल्लाबोल मुळे वातावरण तप्त बनले. सत्ताधारी गटातून त्यांना रोखले जावे असे सांगितले, पण प्रतिकार करण्यास कोणीही पुढे आले नाही.

सत्ताधाऱ्यांच्या सभा गुंडाळण्याच्या प्रकाराचा निषेध
सभा संपल्यावर विरोधकांनी सत्ताधारी गटाने सभा गुंडाळल्याचा निषेध नोंदवला. भाजप आणि पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने गोकुळच्या सभेत बोगस सभासद घुसवले, असा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. तसेच सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांनी सभा गुंडाळली असा आरोप करून या बेकायदेशीर प्रक्रियेविरोधात कायदेशीर लढा देणार असल्याचे सांगितले. सभासदांचे पाठबळ होते तर त्यांनी सभा का चालवली नाही, अशी विचारणा करून त्यांनी बहुराज्य ठरावास बहुसंख्य सभासदांनी विरोध केला असल्याचा दावा केला.