पुरामुळे १०० लाख टन उसाला फटका

मुंबई : कोल्हापूर-सांगली -सातारा भागात आलेल्या महापुरामुळे सुमारे १०० लाख टन ऊस वाया गेला असून त्यामुळे साखरेच्या उत्पादनातही १२ ते १३ लाख टनांची घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यावर साखर-टंचाईचे दाट सावट आहे.

गेल्या वर्षी राज्यात ११.६५ लाख हेक्टर क्षेत्रावर ९५२ लाख मेट्रिक टन ऊस झाला. त्यातून १०७ लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या साखरेचा प्रश्न निर्माण झाला. साखर मोठय़ा प्रमाणात पडून राहिल्याने साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे पैसे थकले. त्यामुळे राज्यातील साखर उद्योग आणि त्यावर अवलंबून असलेले २० लाख शेतकरी अडचणीत आले. देशातही जवळपास हीच परिस्थिती असल्याने केंद्र सरकारने शिल्लक साखरेच्या प्रश्नात दिलासा देण्यासाठी निर्यात अनुदान जाहीर केले. त्यामुळे मुळात काही प्रमाणात शिल्लक साखरेचे प्रमाण घटणार आहे. त्यात या पूरसंकटाची भर पडली आहे.

महापुरामुळे कोल्हापूर-सांगली-साताऱ्याबरोबरच सोलापूर-नगरमध्ये काही प्रमाणात नदीकाठचा ऊस वाया गेला आहे. एकंदर १०० लाख टन उसाला अतिवृष्टीचा फटका बसला असून आता नव्या हंगामातील गाळपासाठी ५७० लाख टनऐवजी ४७० लाख टनच ऊस उपलब्ध होईल, असा अंदाज असल्याचे राज्य साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी सांगितले. आगामी साखर हंगामात ६५ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित होते. महापुरामुळे ऊसच कमी झाल्याने आता ५१ ते ५२ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली. शिलकी साखरेचा साठा ५८ लाख मे. टन एवढा आहे.

ऊस घसरण..

*नोव्हेंबरमध्ये २०१९-२० साखर हंगाम सुरू होणार.

* गेल्या वर्षीपासूनच्या दुष्काळामुळे या हंगामासाठी ८.४३ लाख हेक्टरवरच ऊस उभा.

* केवळ ५७० लाख मे. टन ऊस गाळपासाठी उपलब्ध.

* गेल्या वर्षीच्या तुलनेत दुष्काळामुळे ऊसक्षेत्रात २७ टक्क्यांची तर ऊस उत्पादनात ४० टक्क्यांची घट.