करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर ३० एप्रिल पर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा आणि श्री अंबाबाईचा रथोत्सव सुद्धा करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. मंदिरामध्ये केवळ नित्यनैमित्तिक पूजा-अर्चा सुरू राहणार असल्याचं देवस्थानाच्यावतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिरासह देवस्थान समितीच्या आखत्यारीतील सर्व मंदिरे भाविकांसाठी आज (५ एप्रिल) ते ३० एप्रिलपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
तसेच जोतिबा यात्रा रद्द करण्यात आली आहे. याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे वतीने करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची यात्रा मागील वर्षीही करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या रद्द करण्यात आली होती. चैत्र पौर्णिमेला गर्दीने फुलून जाणारा मंदिर परिसर मागील वर्षीही सुनासुनाच होता. दरवर्षी महाराष्ट्र,  कर्नाटक,  गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश यासह अन्य काही राज्यातील भाविक चैत्र पौर्णिमेला होणाऱ्या यात्रेसाठी या ठिकाणी येतात. मात्र मागील वर्षी यामध्ये खंड पडला आणि या वर्षीही करोनामुळे यात्रा रद्द करण्यात आलीय. सामान्यपणे या यात्रेला सहा लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. या अगोदर २०२० च्या आधी १८९९ मध्ये प्रथमच जोतिबाची चैत्र यात्रा रद्द करण्यात आली होती. तेव्हा प्लेगची साथ असल्याने यात्रा बंदचा आदेश देण्यात आला होता.