सदनिका खरेदीचा तुकडेबंदी-तुकडेजोड प्रांताधिकारी यांच्याकडून नियमित करून देण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारल्याने, येथील एका लिपिकावर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सागर आनंदराव शिगावकर (वय ३६, रा. रविवार पेठ, कोल्हापूर) असे या लिपिकाचे नाव आहे.

यातील तक्रारदार यांनी विक्री केलेल्या सदनिकेचा खरेदी विक्री व्यवहार शासनाच्या तुकडेबंदी-तुकडेजोड कायद्याप्रमाणे करून, तसा आदेश देण्यासाठी राधानगरी-कागल उपविभागीय अधिकारी कार्यालय, येथील जमिन संकलन लिपिक शिगावकर याने १ लाख २० हजार रुपयांची लाचेची रक्कम मागितली होती.

याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यावरून आज पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या पथकातील शाम बुचडे, मयूर देसाई, रुपेश माने व संदीप पडवळ यांनी सापळा लावला. शिगावकर याने लाचेची रक्कम स्वीकारल्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.