कोरेगाव भीमामधील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट असल्याचा अहवाल सत्यशोधन समितीने दिला आहे. पोलिसांच्या गाफिलपणामुळे हिंसाचार उसळला असंही समितीने म्हटलं आहे. एवढंच नाही तर मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे या दोघांनीही हिंसाचार होईल अशी परिस्थिती निर्माण केल्याचेही अहवालात नमूद केले आहे. कोरेगाव भीमा या ठिकाणी १ जानेवारीला हिंसाचार उसळला होता. यानंतर यामागे नेमके कोण आहे? याचा शोध घेण्यासाठी सत्यशोधन समितीची स्थापना करण्यात आली होती.

पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे या समितीचे अध्यक्ष होते. सत्यशोधन समितीने त्यांचा अहवाल कोल्हापूर परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांकडे सोपवला. वढू बद्रुक आणि गोविंद गायकवाड यांच्या इतिहासाची मोडतोड करण्यासाठीच मिलिंद एकबोटे यांनी संभाजी महाराज स्मृती समितीची स्थापना केली होती असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गोविंद गायकवाड यांनी केलेल्या कामाचा उल्लेख समाधीजवळच्या फलकावर करण्यात आला होता. तो फलक हटवण्यात आला, त्यानंतर तिथे नवा फलक लावण्यात आला. नव्या फलकावर गोविंद गायकवाड यांच्याबाबत दिलेली माहिती चुकीची होती. तसेच के. बी. हेडगेवार यांचाही फोटो या फलकावर लावण्यात आला होता असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण व्हावी या हेतूनेच हा फलक लावण्यात आला. या संदर्भात पोलिसांनी योग पावले वेळीच उचलली असती तर हिंसाचार टळू शकला असता असेही समितीने त्यांच्या अहवालात म्हटले आहे. ‘मुंबई मिरर’ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.  कोरेगाव भीमामध्ये या घटना घडत होत्या तेव्हा पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली अशा शब्दात समितीने टीका केली आहे. पोलिसांना हिंसाचाराची माहिती देणारे फोनही येत होते मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले असा ठपकाही समितीने ठेवला आहे. हिंसाचार होत होता तेव्हा पोलीस आपल्यासोबत आहेत अशा घोषणा देण्यापर्यंत काहींची मजल गेली होती. असंही सत्यशोधन समितीने अहवालात म्हटलं आहे.