अद्याप २२ बेपत्ता; मदतीला वेग
कराड : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीने भूस्खलनाच्या घडलेल्या बारा घटनांमधील १८ मृतदेह शनिवारी सायंकाळपर्यंत ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या व स्थानिक लोकांना यश आले. पाटण, महाबळेश्वर, जावली आणि वाई येथे परवा, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास १२ ठिकाणी डोंगरकडे कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये अनेक घरे गाडली गेली. अद्याप २२ लोक बेपत्ता असून, ३ हजार २४ पशुधनांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

दुर्घटनास्थळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, वित्त व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या अतिवृष्टीत २७९ गावे बाधित झाली आहेत. त्यातील १ हजार ३२४ कुटुंबांतील पावणेसहा हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. पाटण तालुक्यातील ७०, वाई ५१, महाबळेश्वर ११३, सातारा १३ आणि जावली तालुक्यातील १०२ गावे बाधित झाली असल्याचे निवेदन प्रशासनाने केले आहे.

भूस्खलानाचा सर्वांत मोठा तडाखा पाटण तालुक्यातील खालचे आंबेघर गावाला बसला. येथे आज सहा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. देवरूखवाडी तसेच मिरगाव, ढोकावळेत, हुंबरळीत, कोयनानगर, किल्ले मोरगिरी, टाळेवाडी, गुंजाळी, काठेवाडी, मेष्टेवाडी, टोळेवाडी, जितकरवाडी, कामगारगाव आदी ठिकाणी डोंगरकडे कोसळून घरे व पशुधनाचे गोठे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्याने तेथेही मदतकार्य जोमाने सुरू आहे. मात्र ताज्या माहितीनुसार खालचे आंबेघर, देवरूखवाडी व मिरगाव येथे जीवितहानी झाल्याची माहिती आहे. अंदाजे बेपत्ता असलेल्या ४० जणांपैकी १८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक लोकांच्या मदतीने प्रशासनास यश आले आहे.