वेगळ्या राज्याच्या मुद्यावर विदर्भात सुरू असलेल्या जनमत चाचणीत शिवसैनिकही मोठय़ा प्रमाणावर सहभागी होऊन मतदान करीत आहेत, या चाचण्यांना विदर्भात चांगला प्रतिसाद मिळत आहे, असा दावा विदर्भ राज्य संयुक्त समितीचे नेते व माजी आमदार वामनराव चटप यांनी गुरुवारी लोकसत्ताशी बोलतांना केला.  
संयुक्त समितीतर्फे सध्या विदर्भात प्रमुख शहरांमध्ये वेगळ्या विदर्भ राज्यासाठीच्या मागणीवर जनमत चाचणी घेतली जात आहे. अमरावती व नागपूरनंतर गुरुवारी चंद्रपूर येथे या चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. पुढील टप्प्यात यवतमाळला जनमताचा कौल आजमावला जाणार आहे. आतापर्यंत तीन ठिकाणी झालेल्या चाचण्यांमध्ये शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मतदानात भाग घेऊन स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने कौल देत असल्याचा दावा चटप यांनी केला. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला शिवसेनेचा स्पष्ट विरोध आहे. या पाश्र्वभूमीवर अनेक शिवसैनिक पक्षाची भूमिका काहीही असली तरी आम्ही मात्र विदर्भाच्या बाजूचे आहोत, असे सांगत मतदानात भाग घेत असल्याचे चटप यांनी सांगितले. नागपूर व अमरावतीत अनेक शिवसैनिकांनी, तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मतदानाच्या आधी आपल्याशी संपर्क साधला होता. पक्षाची भूमिका विदर्भ राज्याच्या बाजूची नसल्याने अनेकदा आम्हाला चूप बसावे लागते. मात्र, जनमताची चाचणी गुप्त स्वरूपाची असल्याने यात भाग घेण्यास कोणतीही अडचण नाही, अशी भूमिका अनेक शिवसैनिकांनी या काळात आपल्याजवळ बोलून दाखवल्याचे चटप यांनी सांगितले. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.