शिवसेनेला मलिष्कासारखं कोणी काही बोललं की ते नाराज होतात. महापालिकेचे अधिकारी ज्या तत्परतेने मलिष्काच्या घरी गेले त्याच तत्परतेने त्यांनी मातोश्रीवरही जायला पाहिजे. मग महापालिकेवर भरोसा आहे का ?,  याचे उत्तर सेनेला मिळाले असते अशा शब्दात  विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले आहेत. शिवसेनेच्या मेंदूत झोल-झोल, म्हणून त्यांची भूमिका गोल-गोल असा टोलाही त्यांनी लगावला.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे- पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसवगळता उर्वरित विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेना आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. आर जे मलिष्कावरुन झालेल्या वादाचा दाखला देत विखे-पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याऐवजी मलिष्कावर मानहानीचा खटला दाखल करण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. ही एखाद्या पक्षाची दिवाळखोरीच म्हणावी लागेल. त्यांच्या मेंदूत झोल- झोल, म्हणून त्यांची भूमिका गोल-गोल अशी त्यांची अवस्था झाली असल्याचे विखे-पाटील म्हणालेत. शिवसेना म्हणजे एक एफएम रेडिओ झाल्याचा चिमटाही त्यांनी काढला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लोक गझनी म्हणू लागलेत. यावर आम्ही काय बोलावं. शिवसेना नेत्यांना गजनीप्रमाणेच त्यांच्या भूमिकेचा विसर पडू लागला आहे असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने सरकारची विश्वासार्हता पणाला लागली होती. आता कोणी वाचवू शकणार नाही असे वाटत असल्याने सरकारने शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरले. पण सरकारने मोठ्या व्यक्तींची नावे वापरण्याचा धंदा बंद करावा अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला. शिक्षणाचं काम करता येत नाही. पण जे शिक्षक ज्ञानदानाचं काम करत आहेत त्यांना तुमच्या कामांची शिक्षा देऊ नका. मुंबईतील रात्र शाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळा महत्त्वाच्या असून या शाळा बंद करण्याचा निर्णया चुकीचा आहे असे मत त्यांनी मांडले. जनतेविरोधात निर्णय घेण्याची सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. आता सरकारचे मंत्री सांगतात की कर्जमाफीसाठी अर्ज वाटप करणार आणि अर्जाच्या सखोल तपासणीनंतर पात्र अर्जदारांनाच कर्जमाफी देऊ. मग सरकारने कर्जमाफीसंदर्भात दिलेला आकडा फसवा होता का असा सवाल त्यांनी सरकारला विचारला. कुपोषण, जीएसटीची अंमलबजावणी या विषयांवरुन सरकारला धारेवर धरु असे त्यांनी सांगितले.