मधुकर किंमतकर यांचा आरोप

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी या भागात सिंचनाची सोय नसणे हे प्रमुख कारण असून यासाठी तत्कालीन पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्वच कारणीभूत आहे. त्यांना विदर्भात येऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचा नैतिक अधिकार नाही, असा आरोप वैधानिक विकास मंडळाचे ज्येष्ठ सदस्य व माजी मंत्री मधुकराव किंमतकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता केला.
शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पवार यांनी विदर्भाचा दौरा केला. किंमतकर यांच्या बोलण्याचा रोख त्यांच्यावरच होता. राज्यनिर्मितीनंतर सर्व क्षेत्राचा समतोल विकास, हे सूत्र ठरलेले असताना विदर्भाच्या बाबतीत ते कधीच पाळले गेले नाही. उलट विदर्भाच्या वाटय़ाचे जे काही पळवता येईल ते पळविण्याचाच प्रयत्न झाला. सिंचनाचाच विचार केला तर ही बाब स्पष्ट होते. गोदावरी-तापी खोऱ्यातील विदर्भाच्या वाटय़ाच्या पाण्याचा पूर्ण वापर झाला तर त्यातून या भागाचे ८० टक्के क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. मराठवाडय़ातील उपलब्ध पाण्याचा विचार केला, तर तेथील ४५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. कृष्णा खोऱ्यातील पाण्याचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील ६५ ते ७० टक्के जमिनीला ते मिळू शकते. प्रत्यक्षात आतापर्यंत फक्त पश्चिम महाराष्ट्राचेच हित जोपासण्यात आले. कृष्णा खोऱ्यासाठी स्वतंत्र मंत्री देण्यात आला. दुसरीकडे विदर्भात सिंचनाची व्यवस्थाच होऊ दिली नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि आता त्यांच्यावर अन्याय करणारे पश्चिम महाराष्ट्रातील नेते त्यांचे सांत्वन करीत फिरत आहेत.
विदर्भात पाणी आहे पण प्रकल्प पूर्ण न झाल्याने ते शेतापर्यंत पोहोचू शकत नाही, केवळ निधी देऊन फायदा नाही तर त्यासाठी लागणारी यंत्रणा, तंत्रज्ञ, आवश्यक कर्मचारी, अधिकारीसुद्धा देणे गरजेचे आहे. विदर्भात याचीच वानवा आहे. विदर्भातील राजकीय नेतृत्वात हे मुद्दे उचलून धरण्याची ताकद नाही, उलट तेच पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या मागे धावतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.