राजापूर : तालुक्यातील तेरवण थोरलीवाडी येथील विहिरीमध्ये बिबटय़ाचे पिल्लू पडल्याची घटना घडली. वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने बिबटय़ाच्या पिल्लाला विहिरीतून सुखरूपपणे बाहेर काढले. हे पिल्लू तीन महिन्यांचे मादी जातीचे असल्याची माहिती वनविभागने दिली. बिबटय़ाचे पिल्लू विहिरीमध्ये नेमके कसे पडले हे समजू शकलेले नाही. विहिरीतून पिल्लू बाहेर काढल्यानंतर जंगलामध्ये सोडून देण्यात आले.
तेरवण थोरलीवाडी येथील ग्रामस्थ केशव लक्ष्मण खडबडे यांची विहीर आहे. पाण्याने अर्धवट स्थितीमध्ये भरलेल्या या विहिरीवर आज सकाळी नेहमीप्रमाणे काही माणसे पाणी भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्यांना विहिरीमध्ये कोणी तरी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी विहिरीमध्ये डोकावून पाहिले असता विहिरीच्या पाण्यावर बिबटय़ा तरंगत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे दृश्य पाहून त्यांची सुरुवातीला घाबरगुंडी उडाली. या माणसांनी ही माहिती तातडीने घर मालकांना दिली. दरम्यान ही माहिती सगळीकडे पसरताच लोकांनी विहिरीकडे बिबटय़ाला पाहण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे विहिरीच्या काठावर बिबटय़ाला पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी झाली होती. दरम्यान काही ग्रामस्थांनी ही माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या राजापूरच्या वनपाल राजश्री कीर, वनरक्षक संजय रणधीर, कर्मचारी दीपक म्हादये, विजय म्हादये आदींसमवेत तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यातच, पंचायत समितीचे सभापती अभिजीत तेली, पोलीस पाटील गजानन बाइंग यांना माहिती मिळताच तेही घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने तातडीने बिबटय़ाला विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. काही कालावधीनंतर पिंजऱ्याच्या साहाय्याने बिबटय़ाच्या पिल्लाला बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. यासाठी वनविभागाला विभागीय वनअधिकारी विजयराज सुर्वे, परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांनी मार्गदर्शन केले.