News Flash

जिल्ह्य़ात मत्स्योत्पादनात घट

अनेक वर्षांंपासून पालघर परिसरात सुरू असलेल्या पारंपरिक पद्धतीच्या मासेमारीला यांत्रिकीकरणाची जोड मिळाली असली तरी अनेक कारणांमुळे मत्स्योत्पादनात कमालीची घट झाली आहे.

सहा वर्षांत सर्वाधिक मासेमारी ही २०१४-१५ व १७-१८ या वर्षांत झाली असली तरी इतर वर्षांत ७५ हजार टनाचा पुढचा टप्पा मत्स्योत्पादनाने गाठलेला नाही.

सहा वर्षांत केवळ २०१४-१५ आणि २०१७-१८ मध्येच सर्वाधिक मासेमारी

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर: अनेक वर्षांंपासून पालघर परिसरात सुरू असलेल्या पारंपरिक पद्धतीच्या मासेमारीला यांत्रिकीकरणाची जोड मिळाली असली तरी अनेक कारणांमुळे मत्स्योत्पादनात कमालीची घट झाली आहे. यामध्ये प्रसिद्ध असलेल्या सातपाटी पापलेटचाही समावेश आहे.  सहा वर्षांत सर्वाधिक मासेमारी ही २०१४-१५ व १७-१८ या वर्षांत झाली असली तरी इतर वर्षांत ७५ हजार टनाचा पुढचा टप्पा मत्स्योत्पादनाने गाठलेला नाही.

पालघर जिल्ह्य़ात मत्स्य उत्पादन मोठय़ा प्रमाणात होते. डहाणू, सातपाटी-मुरबे, झाई, अर्नाळा अशा महत्त्वाच्या मच्छीमार बंदरातून घोळ, दाढा, रावस, सुरमई, हलवा, कोळंबी, बोंबील आदींची मासेमारी केली जाते.   या माशांची मिळकत कमी होत आहे.  हवामान बदलांसह इतर कारणांमुळे गेल्या तीन वर्षांतील मत्स्योत्पादन घटत चालले आहे. तसेच मासेमारी नौकांची वाढती संख्या, बेसुमार तसेच बंदीच्या कालावधीत होणारी मासेमारी, समुद्रातील मासेमारीसाठी मोठय़ा प्रमाणात लावण्यात येणारी जाळी अशा कारणांमुळेही मत्स्योत्पादन कमी होत आहे.

केंद्रीय समुद्री मत्स्यकी संशोधन संस्थेने मासेमारी करताना नेमून दिलेल्या विशिष्ट मासेमारीसाठी त्याच आकाराचे आस असलेली जाळी वापरण्याच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नसल्याचेही दिसून येते.  गेल्या काही वर्षांत समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे तर अनेक वेळा मच्छीमारांनी आपल्या बोटी समुद्रात मासेमारीसाठी न नेल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक भरुदड सहन करावा लागला आहे. याचबरोबरीने समुद्रात एलईडी व पर्ससीनधारक बोट मालक समुद्रातून बेकायदेशीररीत्या बेसुमार मच्छीमारी करत असल्यामुळे या प्रकाराच्या मच्छीमारीमुळे मत्स्य साठे नष्ट होत चालले आहेत. तसेच मत्स्य साठय़ांचे स्थलांतरही होत आहे.

दरम्यान पालघर जिल्ह्यत यांत्रिकी नौकाद्वारे सुमारे ८० हजार ९२१ जण डॉलनेट पद्धतीच्या जाळीने, तर सुमारे २०,००० जण गिलनेट जाळीने मासेमारी करीत आहेत, तर इतर ८१ जण इतर जाळीने मासेमारी करीत आहेत. एकूण ९९,४६२ जण या तीनच पद्धतीच्या जाळीने मासेमारी करतात अशी माहिती देण्यात येते.

२०१८-१९ वर्षांत मोठी घट

उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार पालघर जिल्ह्यचे २०१७-१८ या वर्षांत मत्स्योत्पादन ८५,९५९ इतके टन तर १८-१९ या वर्षांतील मत्स्योत्पादन ७२,८४५ इतके टन होते. याचाच अर्थ १७-१८ च्या तुलनेत १८-१९ या वर्षांत मत्स्योत्पादन १३,११४ टनने घटले. २०१७-१८ या वर्षांत पापलेटची मासेमारी ११,२२४ इतकी टन होती.१८-१९ मध्ये ती ९,२९३ इतकी झाली.म्हणजेच एका वर्षांत ही मासेमारी १,९३१ टनने घटली आहे.  पालघर जिल्ह्यत मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत डहाणू, पोफरण-दांडी, सातपाटी, केळवा, वसई अशी पाच प्रमुख बंदरे आहेत. या पाचही प्रमुख बंदरांमध्ये २०१४-१५ मध्ये ८७ हजार ५८४ टन मत्स्य उत्पादन झाले होते. २०१५-१६ मध्ये ७२ हजार ५३७ टन, १६-१७ मध्ये ७० हजार ७४३ टन, १७-१८ मध्ये ८५ हजार ९५९ तर १८-१९ मध्ये ७२८४५ टन मत्स्य उत्पादन झालेले आहे. सर्वाधिक मासेमारी ही २०१४-१५ व १७-१८ या वर्षांत झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 2:14 pm

Web Title: less fishery in palghar dd70
Next Stories
1 पालघरमधील हुतात्मा स्तंभाची दुरवस्था
2 एकाच दिवशी दोन पदांवर नियुक्ती
3 शिवेंद्रराजेंच्या जाहीर धमकीवर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Just Now!
X