१६० तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

मुंबई : कोकण-मुंबईसह पुणे व आसपासच्या भागांत गेला आठवडाभर पावसाचा जोर कायम असताना महाराष्ट्रातील १६० तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असून पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेला तरी निम्म्याहून अधिक महाराष्ट्रातील शेतकरी खरिपाच्या पेरण्यांसाठी खोळंबले आहेत. आतापर्यंत खरिपाच्या ७५ टक्के पेरण्या अपेक्षित असताना राज्यात अवघ्या ४३ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

जूनच्या अखेरीस कोकण व मुंबई-ठाणे, पालघर, पुणे, नाशिक पट्टय़ात पावसाने चांगली हजेरी लावली. आता १० दिवस उलटून गेले तरी या भागात पावसाचा जोर कायम आहे. त्याच वेळी मराठवाडा आणि इतर अनेक जिल्ह्य़ांत पावसाने ओढ दिली आहे. गेले वर्ष दुष्काळात गेले. जूनच्या अखेरीस पावसाने कोकणात दमदार हजेरी लावल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र आता जुलैचे १० दिवस उलटून गेले तरी मराठवाडय़ाच्या बहुतांश भागासह राज्यातील १६० तालुक्यांत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला, तर १९४ तालुक्यांत ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे.

अपुऱ्या पावसामुळे राज्यातील खरिपाच्या पेरण्यांचे प्रमाण अवघे ४३ टक्केच आहे. निम्म्याहून अधिक महाराष्ट्र पेरण्यांसाठी पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. कोकण वगळता त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रात चांगल्या पेरण्या झाल्या आहेत. तेथील पेरण्यांचे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक झाले आहे.

जलस्थिती..

राज्यातील ३२६७ धरणांमध्ये १७.५२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात २८.७७ टक्के पाणीसाठा होता. कोकणातील धरणांमध्ये सर्वाधिक ४४ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर मराठवाडय़ातील धरणांमध्ये सर्वात कमी ०.८ टक्के पाणीसाठाच शिल्लक आहे. पुणे विभागातील धरणांत २६.५७ टक्के पाणीसाठा झाला आहे. राज्यातील काही भागांत पाऊस झाल्याने टँकरचे प्रमाण मात्र मागील आठवडय़ाच्या तुलनेत कमी झाले आहे. मागील आठवडय़ात ६२९८ टँकर सुरू होते. आता ते प्रमाण ४५३२ पर्यंत कमी झाले आहे. मागील वर्षी या काळात ७३८ टँकरच सुरू होते.

जुलैचे १० दिवस उलटून गेले असताना खरिपाच्या पेरण्यांचे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत जाणे अपेक्षित होते. मात्र आजमितीस ४३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. मराठवाडय़ात पेरण्यांचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

-सुहास दिवसे, कृषी आयुक्त