भारतातील संगणक क्षेत्राची पताका विश्वात फडकविणारे संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांची ‘चतुरंग प्रतिष्ठान’च्या जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या डिसेंबरमध्ये डोबिंवलीमध्ये होणाऱ्या ‘चतुरंग संमेलना’त डॉ. भटकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीचा ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. देशासमोर महासंगणक निर्मितीचे आव्हान असताना डॉ. भटकर यांनी प्रथम श्रेणीतील महासंगणकाची निर्मिती केली आणि भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. इतकेच नव्हे तर त्यांनी खास ‘जीआयएसटी’ हे तंत्रज्ञान विकसित केले आणि संगणक क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकले. डॉ. भटकर यांनी आपल्या ‘एज्युकेशन टू होम’ या संस्थेच्या माध्यमातून बालके आणि युवकांचे भविष्य उज्ज्वल करण्याचे काम हाती घेतले असून त्याचा उपयोग अनेकांना होत आहे. सामाजिक बांधीलकी जोपासून संगणक क्षेत्रामध्ये केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल डॉ. भटकर यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या निवड समितीने डॉ. भटकर यांची पुरस्कारासाठी निवड केली. समितीमध्ये डॉ. सुभाष देव, डॉ. वसुधा कामत, अविनाश धर्माधिकारी आणि भानू काळे आदींचा समावेश होता. ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे येत्या डिसेंबरमध्ये ‘चतुरंग संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभात डॉ. भटकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या पाच मान्यवरांना यापूर्वी ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये संगमनेर येथील कै. प्रा. म. वि. कौंडिल्य, मुंबईमधील प्रा. राम जोशी, साताऱ्यातील बॅ. पी. जी. पाटील, पुण्यातील डॉ. जयंतराव नारळीकर, आणि डॉ. राम ताकवले यांचा समावेश आहे.